पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथे अल्पसंख्याक ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य करण्यात आले आहे. जमावाने शनिवारी सकाळी सरगोधामधील मुजाहित कॉलनीमध्ये ख्रिश्चनांच्या घरांवर हल्ला केला. कुराणचा अवमान केल्याचा आरोप करून जमावाने हा हल्ला केला. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी संतप्त जमावापासून दोन ख्रिश्चन कुटुंबांचे रक्षण केले आहे आणि सुमारे १५ जणांना अटक केली आहे. हा परिसर लाहोरपासून सुमारे २०० किमी दूर आहे.
सरगोधा पोलिसांनी ख्रिश्चन समुदायाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण शहरात अतिरिक्त पोलिस तैनात केले जातील, अशी ग्वाही दिली आहे.ही घटना कथितपणे कुराणच्या अवमानानंतर झाली. हिंसाचाराला रोखण्यासाठी घटनास्थळी पोलिस युनिट तैनात करण्यात आले होते. या घटनेत दोन जण जखमी झाल्याचा दावा केल जात आहे, मात्र स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा जमाव घरांच्या बाहेर होता.
हे ही वाचा:
चारधाम यात्रेत १५ दिवसांत २०० कोटींहून अधिक व्यवसाय!
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पाचही टप्प्यांतील मतदानाची आकडेवारी जाहीर!
राजकोट दुर्घटनेप्रकरणी गेम झोन मालकासह तिघांना अटक!
पोलिसांनी तातडीने जमावबंदी केली आणि जमावाला पांगवून सर्वांना सुरक्षित बाहेर काढले, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.पोलिसांनी या परिसरात कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगितले असले तरी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांत रक्तबंबाळ झालेल्या एका व्यक्तीला मारहाण केली जात असल्याचे आणि घरांमधील फर्निचर तोडले जात असल्याचे दिसते आहे. एका व्हिडीओत घराबाहेर भीषण आग लागलेलीदेखील दिसते आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र हा व्हिडीओ बनावट असल्याचा दावा केला असून कायदा व सुव्यवस्था असल्याचे नमूद केले आहे.
पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनने जखमी व्यक्तीच्या एका नातेवाइकाशी संपर्क साधला. त्याने सांगितले की, त्याच्या काकांना खूप जखमा झाल्या आहेत आणि ते रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल आहेत. अल्पसंख्याक अधिकार आंदोलनानेही जाहीर केलेल्या निवेदनात ७० वर्षीय व्यक्तींवर जमावाने हल्ला केल्याचे आणि एक घर व कारखान्यात आग लावली गेल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगे सरगोधा, विशेषतः गिलवाला गावात उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.