यंदा कर्तव्यपथावर ‘शिवराज्याभिषेक’

यंदा कर्तव्यपथावर ‘शिवराज्याभिषेक’

देशाचा प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर आलेला असून या दिवशी होणाऱ्या संचालनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या दिवशी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राज्यांचे चित्ररथ सहभागी होत असतात. त्या त्या राज्यांचे वैशिष्ट्य या चित्ररथाच्या माध्यमातून देशभरातील लोकांसमोर ठेवले जाते. यंदा ‘शिवराज्याभिषेक दिन’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ पाहायला मिळणार आहे. आंध्रप्रदेशच्या सीमेवर वैदर्भीय कलावंत हा चित्ररथ साकारत असून त्याची पहिली झलक २३ जानेवारी रोजी कर्तव्यपथावर होणाऱ्या तालमीमध्ये पाहायला मिळणार आहे.

नागपूरच्या शुभ ऍड्स कंपनीला राज्याचा चित्ररथ साकारण्याचे कंत्राट मिळाले आहे. यवतमाळ आणि वर्धा येथील ३० कलावंतांचा समूह दिवसरात्र मेहनत घेऊन हा चित्ररथ साकारत आहेत. तुषार प्रधान (यवतमाळ) आणि रोशन इंगोले (वर्धा) हे दोघे कला दिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळत आहेत. तर, यशवंत एनगुर्तीवार (यवतमाळ) शिल्पकला विभागाचा आणि श्रीपाद भोंगाडे (वर्धा) यांच्यावर हस्तकला विभागाची जबाबदारी आहे.

२० जानेवारी रोजी हा चित्ररथ दिल्लीत पोहोचणार असून २३ तारखेला नृत्य, संगीत आणि पोशाखासह कर्तव्यपथावर सर्व इतर चित्ररथांसह तालीम होणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या दहा वर्षांपासून चित्ररथ साकारणाऱ्या या समूहामध्ये वैदर्भीय कलावंतांचा समावेश कायम आहे. मागील वर्षी शुभ ऍड्स कंपनीच्या खांद्यावर महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तिपीठे’ संकल्पनेवर आधारित चित्ररथासह आसाम, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि अरुणाचल प्रदेश अशा पाच राज्यांचा चित्ररथ साकारण्याची जबाबदारी आली होती. नागपुरातील या कंपनीने ती लिलया पेलत महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरे तर उत्तरप्रदेशच्या चित्ररथाला तिसरे पारितोषिक प्राप्त करून दिले होते.

हे ही वाचा:

लक्षद्वीप मुद्द्यावरून इस्रायल भारताच्या पाठीशी; मोठ्या प्रकल्पाची घोषणा

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टांगती तलवार

पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारे मालदीवचे तीन मंत्री निलंबित

मालदीव मंत्र्यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत स्थानिक नेत्यांमध्येच रोष

२०१५ मध्ये ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. तर २०१८ रोजी ‘शिवराज्याभिषेक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. या दोन्ही चित्ररथांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यापूर्वी १९८० मध्येही शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. १९८३ साली ‘बैलपोळा’ या विषयावरील चित्ररथ सर्वोत्तम ठरला होता. त्यानंतर १९९३ ते १९९५ अशी सलग तीन वर्षे अनुक्रमे गणेशोत्सव, शताब्दी, हापूस आंबे आणि बापू स्मृती या चित्ररथांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.

Exit mobile version