‘त्या महिला कंडक्टरला निलंबित का केले, त्यांचा एसटीसाठी उपयोग झाला असता’

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपस्थित केला सवाल

‘त्या महिला कंडक्टरला निलंबित का केले, त्यांचा एसटीसाठी उपयोग झाला असता’

राज्य परिवहन महामंडळामध्ये कंडक्टर या पदावर काम करणाऱ्या महिलेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यासंदर्भात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.

त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राज्य परिवहनमध्ये काम करणाऱ्या एका महिला कंडक्टरने समाजमाध्यमांवर स्वतःचा एक व्हिडीओ अपलोड केल्याने राज्य परिवहनच्या अधिकाऱ्यांनी तिला कामावरून निलंबित केल्याचं कळतंय. लाखाहून जास्त फोलोअर्स असणाऱ्या महिला कंडक्टरचा ST च्या विविध सुविधा जनतेपर्यंत पोहोचविण्यास उपयोग झाला असता.

चित्रा वाघ पुढे म्हणतात की, सध्या शासकीय कर्मचारी एफबी, ट्विटर, इन्स्टा व इतर समाजमाध्यमांचा वापर करतात. मग केवळ याच महिलेवर कारवाई करण्यामागचे कारण काय? हे एसटी महामंडळाने स्पष्ट करावे.

मंगल सागर गिरी या महिला कंडक्टर उस्मानाबादच्या कळंब आगारात काम करतात. गिरी यांनी परवानगीशिवाय ड्रायव्हरच्या सीटवर बसून व्हीडिओ केला होता. त्यामुळे महामंडळाची प्रतिमा मलिन झाली अशी टीका होऊ लागली. या महिला कंडक्टरने इतर कर्मचाऱ्यांशी बोलताना असभ्य भाषेचा वापर केल्याचेही एसटी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

येत्या १५ दिवसांत यासंदर्भात आपली बाजू मांडण्यास गिरी यांना सांगण्यात आले आहे. याबाबत गिरी यांनी स्पष्टीकरण दिले होते की, कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपादरम्यान आपण काम करत होतो, म्हणून आपल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पूर्वकल्पना न देताच आकसापोटी ही कारवाई आपल्यावर केली गेली आहे.

मंगल गिरी यांचे समाजमाध्यमांवर लाखो फॉलोअर्स आहेत. त्या नियमितपणे स्वतःचे व्हीडिओ पोस्ट करत असतात. एसटी महामंडळाचा गणवेश घालूनही त्यांनी व्हीडिओ शूट केलेले आहेत.

Exit mobile version