कोविडमुळे अर्धमेले झालेलो…जलप्रलयाने सुपडा साफ झाला

कोविडमुळे अर्धमेले झालेलो…जलप्रलयाने सुपडा साफ झाला

काल रात्रीपासून पावसाने कोकणाला झोडपून काढले आहे. रात्रभर कोसळणाऱ्या पावसाचा जोर अजूनही ओसरताना दिसत नाहीये. या पावसामुळे कोकणातील शहरे पाण्याखाली गेली आहेत. या पावसाने सामान्य नागरिकांचे नुकसान केलेच पण व्यापाऱ्यांना बेहाल केले आहे. त्यामुळे आधीच कोविडचा फटका बसून गलितगात्र झालेल्या व्यापाऱ्यांसमोर या पावसाच्या झटक्यातून सावरायचे कसे हा प्रश्न उभा ठाकला आहे.

चिपळूणमध्ये इमरतींचा तळ मजला पूर्णपणे पाण्याखाली बुडाला असून पहिला मजला कोणत्याही क्षणी पाण्याखाली जाऊ शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या एनडीआरएफ अर्थात केंद्रीय बचाव पथकाची तुकडी चिपळूणमध्ये दाखल झाली असून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. चिपळूणमधल्या जलप्रलयात अंदाजे ५ हजार नागरिक अडकल्याची माहिती समजत आहे. या नागरिकांमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. या सर्वच अबालवृद्धांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफच्या तुकड्या कार्यरत आहेत.

हे ही वाचा:

चिपळुणात पूरपरिस्थिती, कोकणात हाहाकार

दैनिक भास्कर समूहावर आयकर विभागाचे छापे

चीनमध्ये पुरामुळे २५ पेक्षा जास्त मृत्यू

आमच्यावर किमान ‘ही’ वेळ आलेली नाही, येणारही नाही

चिपळूणची संपूर्ण बाजारपेठ ही पाण्याखाली बुडाली आहे. येणार श्रावण महिना आणि गणेशोत्सव ह्याच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील व्यापाऱ्यांनी दुकानात नवीन माल भरून ठेवला होता. त्यात कोरोनाची तिसरली लाट येऊन सरकारने लॉकडाऊन लावला तर व्यापाऱ्यांची कोंडी होणारच होती. पण आता या पावसाच्या प्रलयामुळे व्यापाऱ्यांचे कंबरडेच मोडून गेले आहे.

याविषयी ‘न्यूज डंका’ ने चिपळूणमधील तरुण हॉटेल व्यावसायिक आदित्य कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी व्यापाऱ्यांची व्यथा मांडली. या पावसाने चिपळुणातील व्यापाऱ्यांना बेहाल केले आहे. कोरोनाने अर्धमेले झालेल्या व्यापाऱ्यांचा या जलप्रायाने पूर्ण सुपडा साफ झाला आहे असे मत कुलकर्णी यांनी मांडले.

Exit mobile version