भारतासह संपूर्ण जगासाठी वाद उत्पन्न करणाऱ्या चीनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. क्वाड समूहातील सहभागी देशांचे म्हणजेच भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पुढील महिन्यात न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या वार्षिक अधिवेशनात भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत चीनविरोधी वातावरण तयार होऊ शकते.
परराष्ट्रमंत्र्यांच्या या बैठकीत इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या आक्रमकतेविरोधात एक स्वतंत्र आणि खुले क्षेत्र सुनिश्चित करण्यासाठी चार देशांदरम्यान सहकार्याचा विचार केला जाऊ शकतो. क्वाड सदस्य अजूनही या बैठकीसंदर्भात चर्चा करत आहेत. या बैठकीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
संयुक्त राष्ट्राचे वार्षिक अधिवेशन १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ३ मार्च रोजी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आव्हाने या विषयावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री योशिमासा हयाशी आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री एंटनी ब्लिंकन यांच्यात नवी दिल्लीत बैठक झाली होती. आता पुढील महिन्यात न्यूयॉर्कमध्ये अशी बैठक झाल्यास ही या चारही परराष्ट्र मंत्र्यांची चौथी बैठक असेल.
हे ही वाचा:
प्रिगोझिनचा विमान अपघातात मृत्यू हा पूर्वनियोजित कट
चेंबूरमध्ये १७ वर्षाच्या मुलाची हत्या करून तुकडे घरात ठेवले
गोविंदांच्या विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम मंजूर
आजारी बिबट्यासोबत ‘सेल्फी’; त्याच्या पाठीवर स्वार होण्याचा प्रयत्न
या बैठकीत गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनच्या युद्धाबाबतही चर्चा होऊ शकते. मार्चमध्ये झालेल्या बैठकीत रशियाकडून अण्वस्त्रांचा वापर करण्याचा धोका असल्याने त्यावरही परराष्ट्र मंत्र्यांकडून टीका करण्यात आली होती. तर, चीनसोबत भारताचे संबंधही चांगले नाहीत. नुकतेच चीनने नवा नकाशा तयार करून भारताच्या काही भूभागावर आपला हक्क सांगितला आहे. तर, दक्षिण चिनी समुद्रावरही चीन आपला दावा सांगत असल्याने पाश्चिमात्य देशांनी या दाव्याला विरोध केला आहे.