नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात पोलिसांवर समाजकंटकांकडून हल्ला करण्यात आला. वाहनांची जाळपोळ करण्यासोबतच दगडफेकीच्या घटनाही घडल्या. दोन गटात झालेल्या हाणामारीला हिंसक वळण मिळाले. यानंतर तरुणांनी पोलिसांवर आणि घरांवर दगडफेक केली. यात अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर शहराच्या अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून तणापूर्ण शांतता आहे.
हिंसाचारादरम्यान जमावाने एका उपयुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला केला असून इतरांवर दगड आणि इतर वस्तू फेकल्याने अनेक पोलिस जखमी झाले. जखमींमध्ये पोलीस उपायुक्त झोन ५ निकेतन कदम, पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागपुरातील महाल परिसरात जखमी झालेल्या पोलिसांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो) दाखल करण्यात आले.
अधिकारी निकेतन कदम यांना कुऱ्हाडीचे दोन घाव लागले असून जखम खोल असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यानंतर निकेतन कदम यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकेतन कदम यांच्या कामाचं आणि सोमवारी हिंसाचारादरम्यान परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली त्याबाबत त्यांचे कौतुक केले. या दगडफेकीत आग विझवण्यासाठी दाखल झालेले जवान यांच्यावरही जोरदार दगडफेक करण्यात आली. यावेळी आंदोलक दगड, चाकू फेकून मारत होते, अशी प्रतिक्रिया आग विझवायला गेलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली.
हे ही वाचा :
औरंग्याच्या कबरीच्या जागी धनाजी, संताजी, छत्रपती राजाराम महाराजांचे स्मारक उभारा
उत्तर प्रदेश: औरंगजेबाची कबर फोडणाऱ्याला ५ बिघा जमीन, ११ लाख रुपये देणार!
‘उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन मोदींपुढे लोटांगण घालून आले, नंतर पलटी मारली!’
मार्चच्या अखेरीस ओडिशात होणार राष्ट्रीय खोखो स्पर्धा
औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी नागपुरात सोमवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला. संध्याकाळी या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. दोन गटांमध्ये राडा झाला आणि नागपुरातील महाल परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले. उधे एकमेकांवर दगडफेक सुरू झाली आणि वाहनांची जाळपोळ सुरू करण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक झाली. त्यात अनेक पोलीस जखमी झाले असून फायर ब्रिगेडचे चार जवानही जखमी झाले आहेत. समाजकंटकांनी यावेळी रस्त्यावरील दिसेल ती गाडी फोडण्यास सुरुवात केली. चारचाकी आणि दुचाकी वाहने पेटवण्यात आली. सध्या नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.