दिल्लीतील विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. याच दरम्यान, मुख्यमंत्री आणि कालकाजी मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार आतिशी यांनी रविवारी (१२ जानेवारी) आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली. पक्षाच्या कामाला आणि प्रामाणिकपणाच्या राजकारणाला लोक पाठिंबा देतील, अशी आशा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
क्राउड फंडिंग मोहिमेचा शुभारंभ करत मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, ‘आम आदमी पक्षाचे आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री प्रामाणिकपणे काम करतात. मागच्या वेळीही आम्ही देशातील आणि दिल्लीतील जनतेची मदत घेऊन निवडणूक लढवली होती आणि यावेळीही आम्ही जनतेच्या पाठिंब्याने निवडणूक लढवत आहोत. कालकाजी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मला ४० लाख रुपयांची गरज आहे. दिल्लीकर १०० रुपये किंवा १००० रुपये देऊन मदत करू शकतात, असे त्यांनी म्हटले.
हे ही वाचा :
इंडोनेशियन राष्ट्रपती सुबियांतो प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे
प्रशांत कुमार सिंग मणिपूरचे नवे मुख्य सचिव
ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात एस जयशंकर उपस्थित राहणार
वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आज होणार मुंबईच्या माजी कर्णधारांचा सत्कार
आम आदमी पार्टीने या संदर्भात पक्षाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर एक ट्विट देखील केले आहे. देशाला आतिशी यांसारख्या सुशिक्षित आणि प्रामाणिक नेत्याची गरज आहे आणि यासाठी आपण सर्वांनी आतिशी यांना क्राउड फंडिंगद्वारे मदत केली पाहिजे. त्यानुसार युपिआय, डेबिट, क्रेडीट कार्डचा वापर करून १०० रुपये, १,००० रुपये अथवा यापेक्षा जास्तही मदत करू शकता, असे ट्वीटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांसाठी एकाच वेळी मतदान होणार आहे. निवडणुकीतील पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा फेरा सुरू आहे. नेते एकमेकांवर जोरदार हल्ले करत आहेत.