महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज १९ फेब्रुवारी रोजी जयंती असून केवळ महाराष्ट्रातच जयंती उत्साहाने साजरी केली जात नाही, तर देशभरात आणि परदेशातही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते म्हणजे स्वराज्याचे संस्थापक, उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, सहिष्णू राजा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तबगारीने भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावर आपला ठसा उमटवला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधव यांच्या कन्या जिजाबाई यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला. पहिली गुरु आई आणि दुसरे गुरु दादोजी कोंडदेव यांच्या सान्निध्यात आणि संस्कारात महाराजांना राज्यशासनाचे आणि युध्द कौशल्याचे शिक्षण बालपणीच मिळाले. दादोजींनी त्यांना युध्द कौशल्यात आणि नितीशास्त्रात पारंगत केले. जिजाऊंनी महाराजांना कृष्णाच्या, श्रीरामाच्या आणि शूरवीरांच्या गोष्टी सांगत त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशस्वी वाटचालीत, महत्त्वाच्या प्रसंगी, संकट काळी आई जिजाऊचे मोलाचे मार्गदर्शन होते. मुघल साम्राज्य आपल्या समाजातील जनतेवर करत असलेल्या अन्यायाची जाणीव त्यांना झाली आणि या अत्याचारातून आपल्या जनतेला मुक्त करण्यासाठी त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली.
रायरेश्वर किल्ल्यावर शिवशंभुच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी २६ एप्रिल १६४५ साली फक्त वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या सवंगडयांसोबत स्वराज्याची शपथ घेतली. ह्याच मावळ्यांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे अनेक मोहीमा फत्ते केल्या. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी या मावळयांनी त्यांच्या रक्ताचं पाणी केलं. त्यांनी विजापूर, दिल्ली आदी राजसत्तांना आपल्यासमोर झुकायला लावले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी पहिला किल्ला जिंकला तो म्हणजे ‘तोरणा’. त्यानंतर मात्र, महाराजांनी कधीही मागे वळून पाहिले नाही की कधी थांबले नाही. किल्ला जिंकला की किल्ल्यावर आपलं वर्चस्व राहतच पण आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवता येतं शिवाय वर्चस्व देखील प्रस्थापित करता येतं हे लक्षात घेऊन महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी साडेतीनशेहून अधिक किल्ले जिंकले. त्यांच्यासोबत त्यावेळी तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, येसाजी कंक, जिवा महाला, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर, कान्होजी जेधे आदी लोक होते. या नावांव्यतिरिक्तही अनेक मावळे स्वराज्याच्या उभारणीसाठी हातभार लावत होते. आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे मुघल, निजाम, आदिलशाही मध्ये हाहाकार माजला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आक्रमणांसमोर हतबल होऊन आदिलशाहाने भर दरबारात त्याच्या सैन्याला महाराजांना मारण्यासाठी कोण विडा उचलेल असे विचारलं होतं. तेव्हा अफजलखानने समोर येऊन हा विडा उचलला होता. स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी अफजलखान विजापूर वरुन निघाला असताना त्याने रस्त्यात येणारी अनेक मंदिरे उध्वस्त केली, अनेक निरपराध लोकांचा बळी घेतला होता. शिवाजी महाराजांनी त्याला प्रतापगडावर तोंड द्यायचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफजलखानचा आग्रह होता.
शिवाजी महाराजांना अफजलखानच्या दगाबाजीची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधानी म्हणून चिलखत चढवले. सोबत बिचवा आणि वाघनखे ठेवली. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलिशान शामियान्यात भेट ठरली. शिवाजी महाराजांसोबत तेव्हा जिवा महाल आणि अफजलखान सोबत सय्यद बंडा हे प्रख्यात असे दांडपट्टेबाज होते. धिप्पाड अफजलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी महाराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफजलखान याने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजी महाराज बचावले. अफजलखानचा दगा पाहून शिवाजी महाराजांनी वाघनखे खानाच्या पोटात खुपसली. त्याचबरोबर अफजलखानची आरोळी सगळीकडे पसरली. सय्यद बंडाने त्याक्षणी महाराजांवर दांडपट्टायाचा वार केला जो लगेच जिवा महालाने स्वत:वर घेतला आणि शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. तेव्हापासून ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण प्रचलित झाली.
अफजलखानच्या मृत्यूनंतर आदिलशाह चिडला आणि त्याने सिद्धि जौहर याला स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी धाडलं. सिद्धि जौहर ने पन्हाळगडाला चौफेर वेढा घातला. त्या वेढ्यातून सिद्धीला तुरी देत महाराज मावळ्यांसह विशालगडाकडे रवाना झाले. शिवाजी महाराजांचा पाठलाग करत सिद्धीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले. तेव्हा महाराजांचे विश्वासू सरदार बाजीप्रभू देशपांडे यांनी राजांना तिथून जाण्याची विनंती केली.
‘लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे’ असे बोलून बाजीप्रभू देशपांडे यांनी महाराजांना विशालगडाकडे कूच करायची विनंती केली. बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या शौर्याची सीमा गाठत सिद्धीच्या सैन्याला रोखून धरले. संख्येने अधिक असलेल्या सैन्याला बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी आपली प्राणाची बाजी लावत अडवून ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप गडावर पोहोचल्याचा संदेश मिळताच बाजीप्रभू देशपांडे यांनी आपले प्राण सोडले.
हे ही वाचा:
रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
गायिका वैशाली भैसनेला जीवे मारण्याची धमकी
‘गायब झालेल्या बंगल्यांची चौकशी व्हायला हवी’
भाजपाची गीतापठणाची मागणी; सपाचा विरोध
१६६४ साली शिवाजी महाराजांनी सुरत वर आक्रमणं केलं त्यामुळे औरंगजेब प्रचंड चिडला. राजा जयसिंग याला महाराजांवर आक्रमण करण्यासाठी त्याने पाठवलं. या लढाईमध्ये महाराजांना हार पत्करावी लागली. त्यांना आपले २३ किल्ले आणि ४ लाख मुद्रा नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागली. मिर्झाराजे जयसिंग याच्याबरोबर झालेल्या तहानुसार १६६६ साली औरंगजेबाने शिवाजी महाराजांना दिल्ली येथे भेटीसाठी बोलावले. त्यानुसार शिवाजी महाराज तसेच संभाजी राजे हे औरंगजेबाच्या दरबारात पोहचले. त्यावेळी संभाजी राजे हे नऊ वर्षांचे होते.दगाबाजी करून महाराजांना नजरकैद करण्यात आले. शेवटी शिवाजी महाराजांनी मिठाईच्या पेटीत बसून आपली आणि संभाजींची सुटका करून घेतली आणि विजापुर मार्गे ते रायगडावर सुखरूप पोहोचले. पुढे महाराजांनी आपला बराच भाग मुघलांच्या ताब्यातून परत मिळवला.
अखेर ६ जून १६७४ रोजी गागाभट्ट यांनी हिंदू परंपरेनुसार अनेक ज्येष्ठांच्या, श्रेष्ठांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शूर आणि युद्ध निपुणच नव्हे तर ते एक उत्तम प्रशासक देखील होते. धर्माच्या नावाखाली त्यांनी काहीही कुणासोबत पक्षपात केला नाही. त्यांनी कधीही कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाही. शत्रूंच्या स्त्रियांनादेखील ते सन्मानपूर्वक वागणूक देत असत. शिवाजी महाराजांनी ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर अखेरचा श्वास घेतला. एक उत्तम राजा, एक उत्तम शासक, मराठा साम्राज्याचे संस्थापक हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातल्या लोकांच्या हृदयात आहेत.