छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर याला विशेष तपास पथकाने (एसआयटी) रविवारी हैदराबाद येथून अटक केली. आता पत्रकाराचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, पत्रकाराच्या डोक्यावर १५ जखमा, मान तुटलेली, यकृताचे ४ तुकडे आणि हृदय फाटल्याचे समोर आले आहे.
२८ वर्षीय पत्रकाराची पोस्टमॉर्टम तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना यकृताचे चार तुकडे, पाच तुटलेल्या बरगड्या, डोक्याला १५ फ्रॅक्चर, मान तुटलेली आणि त्याचे हृदय फाटलेले आढळले. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत असे प्रकरण पाहिले नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हत्येतील आरोपींची संख्या दोनपेक्षा जास्त असावी.
मुकेश चंद्राकर यांच्या हत्येचा आरोपी कंत्राटदार सुरेश चंद्राकर याला अटक करण्यात आली आहे. एसआयटीने त्याला हैदराबाद येथून अटक केली. बिजापूरचे एसपी जितेंद्र सिंह यादव यांनी याला दुजोरा दिला असून आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आल्याचे सांगितले.
हे ही वाचा :
वाल्मिक कराडसोबत फोटो व्हायरल; एसआयटीमधून तीन अधिकाऱ्यांची उचलबांगडी
छत्तीसगडमधील पत्रकार मुकेश हत्या प्रकरणातील मुख्य संशयिताला अटक
कॅनडाचे पंतप्रधन ट्रुडो देणार राजीनामा?
दरम्यान, मुकेश चंद्राकर यांचा मृतदेह ३ जानेवारी रोजी कंत्राटदार सुरेश चंद्राकर यांच्या मालमत्तेवर असलेल्या सेप्टिक टँकमधून सापडला होता. मुकेश १ जानेवारीपासून बेपत्ता होते. मुकेशच्या शोधासाठी पोलिसांनी सुरेश चंद्राकर यांच्या घरावर छापा टाकला होता. तपासादरम्यान तेथील गटाराच्या टाकीत एक मृतदेह सापडला. शरीराची स्थिती अत्यंत वाईट होती, मात्र कपड्यांवरून मृतदेहाची ओळख पत्रकार मुकेश चंद्राकर अशी झाली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास सुरु आहे.