जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. जेएनयुच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलीपुडी पंडित यांनी याबाबत माहिती दिली आहे. जेएनयुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अखंड भारतची संकल्पना आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांचा संघर्ष समजावा हा यामागचा उद्देश आहे. हा अभ्यासक्रम जेएनयु येथील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज अंतर्गत सुरू केला जाईल.
छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज या नावाने सुरू होणाऱ्या या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सहकार्य लाभणार आहे. या कोर्समध्ये इतर विषयांसह भारतीय सामरिक विचार, मराठा लष्करी इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची नौदल रणनीती आणि गनिमी युद्ध शिकविण्यावर भर दिला जाणार आहे. जेएनयूमध्ये मराठा ग्रँड स्ट्रॅटेजी, गुरिल्ला डिप्लोमसी, शिवाजी महाराजांच्या काळातील स्टेटक्राफ्ट आणि त्यानंतर स्टेटक्राफ्ट इत्यादी सहा अभ्यासक्रम शिकवण्याचा प्रस्ताव आहे. या कोर्ससाठी पहिल्या पाच वर्षांत सुमारे १५ ते ३५ कोटी रुपये खर्च येऊ शकतो. डिप्लोमा, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम २०२५-२६ मध्ये सुरू होण्याचे आयोजन आहे.
हे ही वाचा..
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले आप नेते १८ महिन्यानंतर तुरुंगातून येणार बाहेर
सद्गुरू जग्गी वासुदेव यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांकडून एका गैर-स्थानिकाची हत्या!
तोंडाला स्कार्फ बांधून सोफ्यावर धूळ खात बसलेल्या सिनवारला इस्रायलने ठोकले!
“केंद्र सुरू करण्याची कल्पना कुलगुरू आणि काही प्राध्यापकांकडून आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची सागरी रणनीती यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे. आपण अनेक रशियन आणि चिनी विचारवंतांबद्दल शिकवतो, कौटिल्य आणि चाणक्य यांच्याबद्दलही शिकवतो. आम्हाला शिवाजी महाराज आणि त्यांचे सुप्रसिद्ध धोरणात्मक विचारही जोडायचे होते, जेणेकरून विद्यार्थ्यांना फायदा होईल,” अशी माहिती जेएनयूमधील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे प्राचार्य अमिताभ मट्टू यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.