गुकेश ठरला ६४ घरांचा सर्वात तरुण विश्वविजेता!

भारतीय खेळाडूने रचला इतिहास; डिंग लिरेनला केले पराभूत

गुकेश ठरला ६४ घरांचा सर्वात तरुण विश्वविजेता!

भारताच्या डी गुकेशने बुद्धिबळाच्या जगात इतिहास रचला आहे. डी गुकेश बुद्धिबळाचा नवा आणि सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. माजी भारतीय बुद्धिबळ मास्टर विश्वनाथन आनंद यांच्यानंतर जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकणारा डी गुकेश हा दुसरा भारतीय ठरला.

जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२४ चा अंतिम सामना सिंगापूरमध्ये गेल्या वर्षीचा विश्वविजेता डिंग लिरेन विरुद्ध खेळला गेला. या चुरशीच्या सामन्यातील १४व्या डावात विजय मिळवून डी.गुकेशने जागतिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

खरेतर, १३व्या सामन्यापर्यंत डिंग लिरेन आणि गुकेश दोघेही ६.५ गुणांवर होते, तर १४व्या डावातील ५७व्या चालीवर गुकेशने डिंग लिरेनला पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. या खेळात डिंग आणि गुकेश यांच्यात ५० चालींची लढत होती. चीनचा बुद्धिबळपटू डिंग लिरेन आणि गुकेश यांच्यातील सामना बरोबरीत सुटणार होता, पण गुकेशने आपला तोल आणि आत्मविश्वास गमावला नाही. गुकेश सतत आपली स्थिती सुधारत होता.

हे ही वाचा :

रत्नागिरीत वायू गळती, ३० हून अधिक विद्यार्थ्यांना श्वसनासह उलट्यांचा त्रास!

जॉर्ज सोरोस हाच होता यूपीए सरकारचा रिंग मास्टर? ठाकरे- पवार विचारणार का जाब?

अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला २५ वर्षांची शिक्षा भोगावी लागेल!

बस थांबवून चालकाने विकत घेतली दारू; कुर्ला घटनेची पुनरावृत्ती होणार?

गुकेशने आपल्या चालींमध्ये चपळता दाखवून आपली स्थिती मजबूत केली आणि डिंग लिरेनला वेळेच्या दबावाखाली आणले, त्यामुळे डिंग लिरेनने त्याच्या ५३व्या चालीत चुकीची चाल खेळली. याचा फायदा घेत गुकेशने डिंग लिरेनला आणखीनच रसातळाला ढकलले आणि ५७ व्या चालीत डिंग लिरेनला नमवत विजय प्राप्त केला. विजयाचा आनंद गुकेशच्या चेहऱ्यावर दिसत होता. यावेळी त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.

डी गुकेशला मिळालेल्या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया देत अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी ट्वीटकरत म्हटले, “ऐतिहासिक आणि अनुकरणीय. या अद्भुत कामगिरीबद्दल डी गुकेश यांचे खूप अभिनंदन. हे प्रतिभा, कठोर परिश्रम आणि वचनबद्धतेचे परिणाम आहे. त्याच्या या विजयाने बुद्धिबळाच्या इतिहासातच त्याचे नाव कोरले नाही तर लाखो तरुण मनांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि उत्कृष्टता मिळविण्याची प्रेरणा दिली आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

दरम्यान, या विजयासह बुद्धिबळ जगताला आता नवा आणि सर्वात तरुण चॅम्पियन मिळाला आहे. गुकेशच्या आधी, रशियन दिग्गज गॅरी कास्परोव्ह हा सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन होता, ज्याने वयाच्या २२ व्या वर्षी १९८५ मध्ये अनातोली कार्पोव्हचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.

Exit mobile version