प्रज्ञानंदचा आत्मविश्वास; ‘माझ्यात विश्वविजेता होण्याची क्षमता’

टाटा स्टील चेस इंडिया स्पर्धेच्या निमित्ताने प्रज्ञानंद कोलकाता शहरात आला होता.

प्रज्ञानंदचा आत्मविश्वास; ‘माझ्यात विश्वविजेता होण्याची क्षमता’

दीर्घकाळापर्यंत बुद्धिबळ विश्वविजेता राहिलेल्या विश्वनाथन आनंदने भारताचे प्रतिनिधीत्व केले. आता विश्वकप स्पर्धेत उपविजेतेपदाची कामगिरी प्रज्ञानंदने केल्यामुळे त्याच्याकडे संपूर्ण देशाच्या नजरा वळल्या आहेत. त्याकडे सर्वजण पुढील विश्वविजेता म्हणून पाहात आहे. ‘आतापर्यंत मला कोणतेही दडपण जाणवले नाही, परंतु कदाचित यापुढे मी आतापेक्षा वेगळा असेल,’ अशी प्रतिक्रिया त्याने सोमवारी दिली. तो टाटा स्टील चेस इंडिया स्पर्धेच्या निमित्ताने कोलकाता शहरात आला होता.

 

‘अजून मला माझ्या खेळात बऱ्याच सुधारणा करायच्या आहेत. परंतु मला वाटते, मी आता जिथे आहे, त्यापेक्षा खूप वर जाऊ शकतो. मला वाटते की माझ्याकडे विश्वविजेते होण्याची क्षमता आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत आहे,’ असे प्रज्ञानंदने आत्मविश्वासाने सांगितले.

 

‘मी नेहमीच वाईट परिस्थितीत अन्य पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतो. हे एक कौशल्य आहे आणि मला वाटते की, हे कौशल्य सर्वोत्तम होण्यासाठी आवश्यक आहे,’ अशी टिप्पणी त्याने केली. प्रज्ञानंदने डी. गुकेश, निहाल सरीन आणि अर्जुन यांसारख्या खेळाडूंनाही उज्ज्वल भविष्य असल्याचे सांगितले. ‘आम्ही सर्व खूप मजबूत आहोत. मला आशा आहे की, निहाल लवकरच २७०० गुणांचा टप्पा पार करले. कदाचित पुढच्या स्पर्धेतच तो ही कामगिरी करेल. अर्जुन चांगला खेळत असून तो अव्वल विसात स्थान मिळवेल,’ असा आशावाद त्याने व्यक्त केला.

हे ही वाचा:

आदित्य एल १ पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत स्थिरावले

मणिपूरमध्ये संघर्ष भडकावल्याबद्दल ‘एडिटर्स गिल्ड’च्या चौघांविरोधात गुन्हा

नेपाळला पराभूत करत भारताची सुपर ४ मध्ये धडक

आदित्य ठाकरे आता स्टॅलिनलाही मिठी मारा…

 

‘गुकेश आधीच चांगले काम करत आहे. आम्ही सर्व खूप मेहनती आहोत. त्यामुळे आम्ही सर्वजण लवकरच लवकरच शीर्षस्थानी पोहोचू,’ असा विश्वास त्याने व्यक्त केला. “कार्लसन गेल्या काही काळापासून जागतिक बुद्धिबळावर वर्चस्व गाजवत आहे. तो प्रत्येक गोष्टीत बलवान आहे. त्याच्या खेळाबद्दलची समज मला नेहमीच भुरळ पाडते. तो माझा सहकारी म्हणून (ग्लोबल चेस लीगमधील एसजी अल्फिन वॉरियर्ससाठी) आणि प्रतिस्पर्धी म्हणून लाभणे, ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे. तो काहीतरी वेगळे करतोय की तो त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतोय, हे मला पाहायचे आहे. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे,” असे प्रज्ञानंदने सांगितले.

Exit mobile version