आयपीएल २०२४ मध्ये शनिवारी ‘करो या मरो’ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चेन्नईचा पराभव करत प्लेऑफसाठी पात्र ठरत मोठ्या दिमाखात एण्ट्री केली. बेंगळुरूने चेन्नईचा २७ धावांनी पराभव केला. बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करून २१८ धावा केल्या होत्या. परंतु चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी २०१ धावा करायच्या होत्या. मात्र, बेंगळुरूच्या गोलंदाजांनी पाचवेळच्या चॅम्पियनला १९१ धावात रोखले. या दणदणीत विजयानंतर धोनीने २०व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मारलेल्या षटकारामुळे चेन्नईचा पराभव झाला, अशा सोशल मीडियात चर्चा रंगू लागल्या आहेत.
धोनीचा उत्तुंग षटकार आरसीबीसाठी वरदान ठरला. खरं तर, पाऊस आणि आर्द्रता यामुळे जमीन चांगलीच ओली झाली होती. जमीन ओली झाल्यामुळे चेंडू ओला झाला होता. साहजिकच गोलंदाजांच्या हातातून चेंडूही निसटत होता. दुसऱ्या डावात बेंगळुरूला मैदानात पडलेल्या दवामुळे गोलंदाजी करणे अवघड जात होते. बेंगळुरूचा कर्णधार फाफ ड्युप्लेसी आणि विराट कोहली याची वारंवार तक्रार अंपायर्सकडे करताना दिसत होते. परंतु अंपायरने नियमानुसार चेंडू बदलण्यास विरोध केला.
त्यानंतर बेंगळुरूच्या मदतीला चक्क धोनीच धाऊन आला. विसाव्या षटकात चेन्नईला १७ धावांची गरज होती. तेव्हा धोनीने यश दयालचा फुल टॉस बॉल स्टेडियमबाहेर धाडला. त्यानंतर बेंगळुरूला दुसरा चेंडू मिळाला, जो अजिबात ओला नव्हता. मग काय, यशने आपल्या संथ गोलंदाजीची जादू दाखवत आधी धोनीला बाद केले आणि नंतर शार्दुलला एक चेंडू डॉट आणि शेवटी जडेजाला दोन चेंडू डॉट टाकून संघाला प्लेऑफमध्ये नेले.
विराट कोहलीचा यशला गुरुमंत्र
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी यश दयालला मिळाली. त्यावेळी स्ट्राइकवर असलेल्या धोनीला यॉर्कर टाकण्याची कर्णधार फाफ डू प्लेसिसची योजना होती. पण दयालचा चेंडू फुल टॉस पडला आणि धोनीने तो ११० मीटर अंतरावर सीमेपलीकडे पाठवला. या शानदार षटकारानंतर चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी केवळ ११ धावा करायच्या होत्या. त्यानंतर मैदानात एक रंजक ट्विस्ट आला. सीमारेषेजवळ उभा असलेला विराट कोहली धावत दयालकडे गेला आणि त्याला हळू चेंडू टाकण्याचा सल्ला देत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यॉर्कर टाकू नको, हळू गोलंदाजी कर,” असे कोहली म्हणताना दिसला.
हेही वाचा :
बुटांच्या व्यापाऱ्यांच्या घरात सापडले ४० कोटी!
पंतप्रधान मोदींच्या रॅलीत पोहोचले सिंगापूरचे उच्चायुक्त, रॅलीचे फोटो टाकत केले कौतुक!
बहारिनमध्ये सैफुद्दीनचा हिंदू महिलेवर बलात्कार!
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८०८८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
दयालने कोहलीचे म्हणणे ऐकून घेत पुढचा चेंडू सावकाश टाकला. घाईघाईत शॉट मारण्याचा प्रयत्न करताना धोनीने त्याचा झेल स्वप्नील सिंगकडे दिला. दयाळने उर्वरित चार चेंडूंमध्ये आपली रणनीती सुरू ठेवत शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांना अडचणीत आणले. दोन्ही फलंदाजांना एकच धाव करता आली. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग सहाव्या विजयाची नोंद करत प्लेऑफमध्ये पोहोचले.