म्हातारीचा बूट, क्विंन्स नेकलेस, राजाबाई टॉवर चक्क चेंबूरमध्ये !

सार्वजनिक भिंतीवर त्रिमितीय भित्तिशिल्प निर्मितीचा मुंबईतील पहिलाच प्रकल्प

म्हातारीचा बूट, क्विंन्स नेकलेस, राजाबाई टॉवर चक्क चेंबूरमध्ये !

विविध कल्पना लढवून मुंबईचे सौंदर्य वाढवण्याचे काम सध्या जोरात सुरु असल्याचे दिसून येत आहे. मुंबई आणि महानगरात रस्त्याला लागून असलेल्या भिंतीची रंगरंगोटी करून आकर्षक भित्तिचित्रे लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत . संपूर्ण मुंबई अधिक दर्शनीय करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून आता मुंबईतल्या आणखी एका रस्त्याचे रुपडे संपूर्ण पालटलेले बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हँगिंग गार्डन , क्वीन्स नेकलेस या सारखी ठिकाणे बघण्यासाठी आता तेथे जाण्याची गरज नाही, असेही मजेने म्हणता येईल, इतका छान अनुभव या रस्त्यावर चक्कर मारली तरी घेता येणार आहे. चला तर जाणून घेऊ हा कोणता रस्ता आहे ते.

हा रस्ता आहे तो चेंबूरमधील डॉ. एलॉयसिस सोआरेस मार्ग. याच रस्त्याला आता नवे रूप मिळालेले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या चेंबूरच्या एम पश्चिम विभागाच्या कार्यालयाकडून डॉ. एलॉयसिस सोआरेस मार्ग येथे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सार्वजनिक भिंतीवर चित्ताकर्षक अशी त्रिमितीय भित्तिशिल्प निर्मिती करण्यात आली आहे.

मुंबई महानगरात सुशोभिकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध कामे हाती घेतली आहेत. याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक भिंतीवर त्रिमितीय भित्तिशिल्प निर्मितीचा हा मुंबईतील पहिलाच प्रकल्प आहे. त्रिमितीय भित्तिशिल्पासह विविध कामांचे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

चेंबूरच्या डॉ. एलॉयसिस सोआरेस मार्गावर डायमंड गार्डन ते गोल्फ कोर्सपर्यंतच्या पट्ट्यात फिरतांना या आगळ्यावेगळ्या सुशोभीकरणाच्या अनुभव घेता येतो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनोख्या पद्धतीने सुशोभीकरण करण्यात असल्याचे बघायला मिळते . रस्त्याच्या दुतर्फा भिंतींवर मुंबईतील महत्त्वाची ठिकाणे त्रिमितीय भित्तिशिल्प स्वरूपात साकारण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

राज्यात अखेर गो आयोगाची स्थापना

‘खलिस्तानी चळवळीला लंडनमधील शीख समुदायाने नाकारले आहे!’

नेरुळ येथे बांधकाम व्यावसायिकाला गोळ्या घालणारे सापडले बिहारमध्ये

रवींद्र वायकर सुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

एशियाटिक लायब्ररी, राजाबाई टॉवर, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, मरीन ड्राईव्हचा ‘राणीचा कंठहार म्हणजेच क्वीन्स नेकलेस परिसर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची ऐतिहासिक इमारत, फिरोझशाह मेहता उद्यानातील (हँगिंग गार्डन) प्रसिद्ध म्हातारीचा बूट, चेंबूरमधील मेट्रो आणि मोनो जंक्शन याबरोबरच इतर प्रसिद्ध ठिकाणे भित्तिशिल्पाच्या रूपाने मुंबईकरांना पाहता येणार आहेत.

भिंतींवर साकारल्या गोल्फ खेळाडूंच्या मुद्रा
चम्बूरमधील गोल्फ कोर्स देखील प्रसिद्ध आहे. आता त्याचेही नवे रूप बघायला मिळत आहे. पूर्व उपनगरातील एकमेव गोल्फ कोर्स आहे. चेंबूर गोल्फ कोर्सच्या भिंतींवर गोल्फ खेळाडूंच्या मुद्रा अनोख्या पद्धतीने साकार करण्यात आल्या आहेत. या भागातली सर्व वाहतूक बेटांचे देखील सुशोभीकरण करण्यात आले आहे. याच रस्त्यावर स्वातंत्र्य सैनिक उद्यान (चिमणी गार्डन) येथे देखील कृत्रिम वृक्ष उभारून पक्ष्यांसाठी अधिवास तयार करण्यात आला आहे. एम पश्चिम विभागाच्या या प्रकल्पामुळे चेंबूरच्या सौंदर्यात नक्कीच भर पडली आहे.

Exit mobile version