गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर उद्योगपती मुकेश अंबानी समस्त भारतीयांसाठी एक खास भेट आणत आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, १० सप्टेंबर रोजी अंबानी जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. जिओ फोन नेक्स्ट असे या फोनचे नाव आहे. जून महिन्यात झालेल्या रिलायन्स कंपनीच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत या फोनची घोषणा करण्यात आली होती. तर आता सप्टेंबर महिन्यात हा फोन बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे.
‘जिओ फोन नेक्स्ट’ हा रिलायन्स आणि गुगल यांनी एकत्रितपणे तयार केला आहे. हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचे म्हटले जात आहे. या फोनची विक्री किंमत ३४९९ रुपये असणार आहे. तर हा फोन ४ जी प्रकारातील असून यामध्ये अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टिम असणार आहे.
स्वस्त किमतीच्या मानाने शक्य तितकी चांगली फीचर्स देण्याचा जिओने प्रयत्न केलेला दिसतो. या फोन मध्ये जिओने दोन जीबी आणि तीन जीबी रॅम असे पर्याय ठेवल्याची माहिती मिळत आहे. तर भारतीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून बहुभाषा आणि अनुवादाची क्षमता या फोनमध्ये असणार आहे. इंटरनल स्टोरेज च्या बाबतीत या फोनमध्ये १६ जीबी आणि ३२ जीबी असे पर्याय उपलब्ध असतील असे मानण्यात येत आहे. तर ५.५ इंच एचडी क्वाॅलिटीचा डिस्प्ले या फोनला असू शकतो.
या फोनचा फीचर्सविषयी कोणतीही अधिकृत घोषणा अजून पर्यंत करण्यात आली नसली तरि काही लिक अहवालांच्या आधारे ही माहिती सांगण्यात येत आहे. नवनवीन तांत्रिक उपकरणांविषयी माहिती देणाऱ्या काही प्रमुख वेबसाईट्सनी याबद्दलचे वार्तांकन केलेले दिसते.
हे ही वाचा:
पंजशीरमध्ये पाडलं पाकिस्तानचं विमान
एका दिवसात एक कोटी लसीकरणाची भारताची हॅटट्रिक
भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंड ढेपाळला! भारताला २-१ आघाडी
सिरीया, इराकमधून आलेल्या शेजाऱ्यांनी त्याला बनवले अतिरेकी
हा फोन ५०० रुपये डाऊन पेमेंट करून विकत घेणे शक्य होणार आहे. त्यासाठी रिलायन्स काही वित्तीय कंपन्यांसोबत करार केल्याचेही समजते. १० सप्टेंबर रोजी या फोनचे लॉन्चिंग झाल्यानंतर वर्षाअखेर पर्यंत अर्थात डिसेंबर २०२१ पर्यंत पाच कोटी फोन विकण्याचे लक्ष्य रिलायन्स कंपनीने ठेवल्याचे समजते.