चॅट जीपीटीची निर्मिती करणाऱ्या ओपन एआय कंपनीने शुक्रवारी कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांची हकालपट्टी केली. ‘ते कंपनीचे नेतृत्व करू शकतील, हा कंपनीच्या संचालक मंडळाचा विश्वास त्यांनी गमावला आहे,’ असे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने ओपन एआय कंपनीच्या प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी मिरा मुराती यांची हंगामी सीईओ म्हणून नियुक्ती केली असून कायमस्वरूपी सीईओचा शोध सुरू केला आहे.
‘संचालक मंडळाने साकल्याने विचार करून ऑल्टमन यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला आहे. ते संचालक मंडळाशी सातत्याने संवाद साधत नव्हते, विचारविमर्श करत नव्हते. त्यामुळे ते त्यांच्या जबाबदाऱ्या संपूर्ण क्षमतेने पूर्ण करत नव्हते. परिणामी, ओपन आय कंपनी चालवण्याची क्षमता ऑल्टमन यांच्यात आहे, असा विश्वास संचालक मंडळाचा राहिलेला नाही,’ असे कंपनीने नमूद केले आहे.
डीपफेक केसेसच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. भारतात नुकतेच रश्मिका मंदाना, कतरिना कैफ आणि काजोल यांचे डीपफेक व्हिडीओ बनवण्यात आले होते. ऑल्टमन यांनीही ‘एक्स’वर या वृत्ताला दुजोरा दिला. “मी ओपनएआयमध्ये खूप चांगला वेळ व्यतीत केला. त्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यात परिवर्तन झाले आणि आशा आहे की, जगभरातही थोडासा का होईना बदल झाला असेल. सर्वांत जास्त प्रतिभावान व्यक्तींसोबत काम करण्यास मला मिळाले आणि ते मला खूप आवडले. मी भविष्यात काय करणार आहे, हे लवकरच सांगेन,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हे ही वाचा:
भारतीय क्रिकेट टीमचे ‘भगवे’ टी शर्ट ममता बॅनर्जींना नकोसे
कामगाराची व्यथा; मी बोगद्यात अडकलोय, हे आईला सांगू नकोस!
१ ऑक्टोबर रोजी हॉलिवूड अभिनेते टॉम हँक्स यांनीही इन्स्टाग्रामवर डीपफेकच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली होती. दातासंदर्भातील जाहिरातीमध्ये त्यांच्या डीपफेक व्हिडीओचा वापर करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी आपला याच्याशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. मायक्रोसॉफ्टने निधी पुरवल्यानंतर ओपन एआयने गेल्या नोव्हेंबर महिन्यात चॅटजीपीटी चॅटबॉट दाखल केला होता. अल्पावधीतच हे सॉफ्टवेअर जगभरात लोकप्रिय झाले होते.