लसीकरणासाठी नाव नोंदविले, पण प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर लसच उपलब्ध नाही आणि मग हिरमुसले होऊन घरी परतावे लागण्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. मग या लसीकरण केंद्रांवर वशिल्याच्या जोरावर लशी दिल्या जातात का, नाव नोंदणी केलेल्यांना लस का मिळत नाही, अशा प्रश्नांनी जनसामान्यांना भेडसावले आहे. सैफी हॉस्पिटलमध्ये असाच काहीसा संतापजनक प्रकार घडला.
देवेन लोके यांनी आपल्या आईसाठी कोविन अॅपवर नावनोंदणी केली. १२५० रुपये भरून ही नोंदणी त्यांनी कोविन अॅपद्वारे केली आणि ते सैफी हॉस्पिटलला गेले. पण तिथे गेल्यावर त्यांना प्रारंभी प्रवेश नाकारण्यात आला. त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना आपली नोंदणी झाल्याचे सांगितले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, तुम्हाला आत प्रवेश मिळणार नाही, कारण तिथे आधीच १०० लोक आहेत. त्यावर लोके यांनी सांगितले की, माझे तर नाव नोंदविण्यात आले आहे. तेव्हा काहीवेळाने त्यांना आत सोडण्यात आले. लोके यांनी जेव्हा कोविन अॅपवर आपली नावनोंदणी केली तेव्हा केवळ ५० लोकांनाच लस उपलब्ध आहे, असे त्यांना कळले. पण प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये अधिक लोक रांगेत होते. त्या रांगेत ४० पेक्षा कमी वय असलेलेही होते. सरकारने लसींच्या अल्प पुरवठ्यामुळे केवळ ४५पेक्षा अधिक वयाच्या लोकांनाच लस देण्याचा निर्णय घेतला आहे. तरी कमी वयातील लोक रांगेत दिसत होते. ज्यांनी नाव नोंदणी केलेली नव्हती तेही लोक रांगेत होते. काहीवेळ रांगेत उभे राहिल्यानंतर लसीकरण केंद्रातील एकाने येऊन केवळ चार लशी उपलब्ध असल्याचे सांगितले. तेव्हा लोके यांनी विचारणा केली की, माझ्या आईचे नाव नोंदविलेले आहे तिला लस मिळायलाच हवी. तेव्हा त्या माणसाने तुम्हाला लस मिळेल असे सांगितले. पण लोके यांच्या मागे असलेल्या रांगेतील लोकांनी हल्लाबोल केला. चारच लशी उपलब्ध आहेत, पण आमचे तर नाव नोंदविण्यात आले आहे. त्यावर तो माणूस म्हणाला की, लशी संपल्यात. तेव्हा रांगेतील लोक म्हणू लागले की, लस संपेल कशी आम्ही तर नाव नोंदविलेले आहे. ज्यांचे नाव नोंदविलेले नाही, त्यांनाही तुम्ही लशी दिलेल्या असल्या पाहिजेत. तेव्हा तो माणूस घाबरला आणि त्याने सगळ्यांना शांत करत सगळ्यांना लस मिळेल असे सांगितले.
हे ही वाचा:
भारतीय सैन्याने ऑक्सिजन निर्मिती प्लांटची संख्या केली दुप्पट
आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्येच जुंपली
बंगाली हिंदूंच्या प्रश्नावर १५ दिवसांनी न्यायालयाने घेतली दखल
मुख्यमंत्र्यांनी निदान मुंबईचा तरी दौरा करावा
लोके म्हणाले की, जर ५० लोकांसाठीच लस उपलब्ध आहे तर तुम्ही १०० लोकांना लस कशी देता आणि ज्यांची नोंदणी झालेली आहे, त्यांना आधी प्राधान्य द्यायला हवे. बाकीच्यांना नंतर पण तसे होताना दिसले नाही.
एकूणच वशिल्याच्या लोकांना बोलावून त्यांना लसी दिल्या जात आहेत का, ज्यांची नोंदणी झाली आहे त्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत का, हा प्रश्न त्यामुळे लसीकरण केंद्रात उपस्थित असलेले विचारत होते.
यासंदर्भात सैफी हॉस्पिटलशी संपर्क साधल्यावर त्यांच्या हेल्पडेस्कने फोन लसीकरण केंद्राकडे दिला. तेथील तरुणीला यासंदर्भात विचारल्यावर तिने प्रस्तुत प्रतिनिधीला आपले लसीकरण करायचे असेल तर आपण नाव नोंदणी करा आणि लस घ्या, असे सांगितले. तेव्हा प्रतिनिधीने सांगितले की, मला लशीची गरज नाही मला फक्त माहिती द्या. त्यावर आपण नंतर बोलुया म्हणत त्या तरुणीने फोन बंद केला.