गणपती विसर्जनाच्या निमित्ताने ठाणे शहरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. वाहतूक शाखेने वाहतुकीसाठी दुसऱ्या पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे. निमुळत्या रस्त्यावर वाहनांची होणारी कोंडी व जड अंतःकरणानं बाप्पाला निरोप देणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ठाणे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित होत आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी पुढील प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.
यासाठी वाहतूक विभागाने १ सप्टेंबर (दीड दिवस), ४ सप्टेंबर (पाच दिवस), ५ सप्टेंबर (गौरी-गणपती), ६ सप्टेंबर (७ दिवस) आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्थीला ९ सप्टेंबर या दिवशी वाहतूक शाखेने शहरातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. या दिवसांमध्ये वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असून, वाहतूक शाखेकडून परिपत्रक काढण्यात आले आहे.
या परिपत्रकानुसार घोडबंदर रस्त्याने ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना गायमुख जकात नाका तसेच गुजरातकडून घोडबंदर रस्त्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी नाका आणि मुंबई, विरार, वसईकडून घोडबंदरच्या रस्त्याच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांना फाउंटन हॉटेल याठिकाणी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. अवजड वाहने चिंचोटी नाका, कामण, भिवंडी अंजूर फाटा, अंजूर चौक, माणकोली मार्गे इच्छित स्थळी जातील. हा बदल गणपती विसर्जनाच्या दिवशी दुपारी २ वाजल्यापासून गणपती विसर्जन होईपर्यंत लागू करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्रूर मानत होतो, पण त्यांनीच माणुसकी दाखवली
‘स्वातंत्र्यदिनानिमित्त सामुहिक शक्तीचे घडले दर्शन’
गृहमंत्री अमित शहा मुंबईत ‘या’ गणेशोत्सवाला भेट देणार
Twin Tower Demolition: काही सेकंदात कोसळले भ्रष्टाचाराचे टॉवर
तसेच, बेलापूर रस्त्याने तसेच ऐरोली, पटनी मार्गे विटावा जकात नाका, कळवा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना तसेच टीएमटी, एनएमएमटी, एसटी, खासगी बसेसना विटावा जकात नाका येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने ऐरोली, मुलुंड, आनंदनगर जकात नाका, पूर्व द्रुतगती महामार्ग या पर्यायी मार्गावरून जातील. टीएमटी, एनएमएमटी, एसटी आणि खासगी बसेसमधील प्रवासी विटावा जकात नाका येथे उतरतील. तेथूनच प्रवाशांना घेऊन नवी मुंबईकडे जातील. तसेच इतरही मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल केलेला आहे.