आजच्या दिवशी तीन वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला झाला होता. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे २ हजार ५०० जवानांना घेऊन सीआरपीएफचा ताफा ७८ बसमधून जात होता. त्यावेळी हा ताफा पुलवामा येथे पोहोचताच समोरून येणारी एक गाडी जवान असलेल्या एका वाहनावर आदळली आणि त्याच क्षणी तिचा स्फोट झाला. या प्राणघातक हल्ल्यात ४० सीआरपीएफचे जवान शहीद झाले.
या भीषण स्फोट इतका जोरदार होता की संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते. जवानांच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे झाले होते. या घटनेच्या वृत्ताने संपूर्ण देश सुन्न झाला होता.
सीआरपीएफ जवानांचा ताफा जम्मूतील चेनानी रामा ट्रांझिट कॅम्पहून निघाला होता. हा ताफा श्रीनगरच्या बक्शी स्टेडियमजवळ असलेल्या ट्रांझिट कॅम्पच्या दिशेने चालला होता. हा प्रवास ३५० किलोमीटरचा होता. एकूण ७८ बसमधून २ हजार ५०० जवान जम्मूतून निघाले होते. पण दरम्यान, वाटेतच पुलवामा इथे अतिरेक्यांनी जवानांवर हल्ला केला.
विशेष म्हणजे या ताफ्यातील बहुतांश जवान हे नुकतेच सुट्टीवरुन सेवेवर परतले होते. खरतर तब्बल २ हजार ५०० जवानांवर अतिरेक्यांचा निशाणा होता, अशी माहिती नंतर समोर आली होती. यानंतर जैश-ए-मोहम्मदने एक टेक्स्ट एसएमएस करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यानंतर साधारण दोन आठवड्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला केला. भारतीय हवाई दलाने ‘मिराज २०००’ या लढाऊ विमानांच्या सहाय्याने पाकिस्तानात घुसून बालाकोटमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले होते. जैश-ए-मोहम्मदचा बालाकोटमधील मुख्य प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केला होता.
बालाकोटमधील दशहतवादी तळांवर बॉम्बवर्षाव करून भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं माघारी परतल्यानंतर बऱ्याच वेळाने पाकिस्तानला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतीय हवाई हद्दीत घुसून हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारताने तो हल्ला हाणून पाडला. पाकिस्तानचे एफ-१६ हे लढाऊ विमान भारताने पाडले. दरम्यान, हे विमान पाडणाऱ्या मिग-२१चे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हे पॅरेशूटद्वारे पाकच्या हद्दीत लँड झाले होते. त्यानंतर भारताच्या दबावामुळे अभिनंदन यांचीही काही तासांतच मुक्तता करण्यात आली होती.
हे ही वाचा:
नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले
मुलाच्या हव्यासापोटी गरोदर बायकोला केली मारहाण; नंतर दिला तलाक!
‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’
‘राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना’
पुलवामाचा हल्ला, उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर झालेला हल्ला असेल या हल्ल्यांमध्ये दुर्दैवाने आपले अनेक जवान मारले गेले. मात्र, या हल्ल्यांनंतर हल्ला करणाऱ्यांनी आणि देशातील नागरिकांनी एक नवा भारत पाहिला. केवळ आरोप- प्रत्यारोप यामध्ये अडकून न पडणारा भारत देश पाहिला. शत्रूच्या घरात घुसून त्यांचा खात्मा करणारा भारत जगाने पाहिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज ट्विट करत पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सर्व जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचे शौर्य आणि सर्वोच्च बलिदान हे देशातील प्रत्येक नागरिकाला एक चांगला देश घडवण्यासाठी प्रेरणा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
I pay homage to all those martyred in Pulwama on this day in 2019 and recall their outstanding service to our nation. Their bravery and supreme sacrifice motivates every Indian to work towards a strong and prosperous country.
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2022