आमदार गोपिचंद पडळकर यांची मागणी
औरंगाबाद आणि उस्मानाबाद नंतर आता अहमदनगरच्या नामांतराची चर्चा सुरू झाली आहे. भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. या संदर्भात पडळकर यांनी ट्विटही केलं आहे.
हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदुस्तानच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा मुघल, निजामशाहीत हिंदुसंस्कृतीवर हल्ले होत होते, मंदरं लुटली आणि तोडली जात होती. त्यावेळेस अहिल्यामातेनं या हिंदुसंस्कृतीत प्राण फुंकले. त्यांचा जीर्णोद्धार केला. अनेक घाट बांधले, बारव बांधले, मंदिरांचं पुननिर्माण केलं. स्त्रियांना सन्मान मिळवून दिला. लोकहितासाठी कुशल प्रशासनाचा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला असं आमदार पडळकर यांनी पत्रात म्हटलं आहे.
पडळकर पत्रात पुढे म्हणतात, आज जे काही या देशातलं सांस्कृतिक वैभव टिकून आहे त्यात हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा मोठा वाटा आणि वारसा आहे. त्यांची कर्मभूमी अखंड हिंदुस्थान आहे. परंतु त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावी झाला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची ओळख करून देताना निजामशाहीचा इतिहास डोकावता कामा नये तर या हिंदुस्तानच्या प्रेरणास्थान हिंदूराजमाता पुण्यश्लोक होळकर यांच्या जाज्वल्यपूर्ण इतिहासाचे स्मरण झाले पाहिजे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यात यावे, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.
नाव बदलण्याची तमाम अहिल्यादेवीभक्तांची लोकभावना
नाव बदलण्यात यावे अशी तमाम अहिल्यादेवी भक्तांची लोकभावना आहे असे झाल्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावे असणाऱ्या हिंदुस्थानातला पहिला जिल्हा महाराष्ट्रात असेल. ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद असेल. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतराचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी पडळकर यांनी पत्रात केली आहे.
हे ही वाचा:
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ५०० कोटींचा खर्च उद्धवजींनी स्वतःच्या खिशातून करावा!
मुख्यमंत्र्यांनी केली रतन टाटांची विचारपूस
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी
मनी लॉन्डरिंग कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च दिलासा; ईडीविरोधातील सुनावणी
माजी मुख्यमंत्र्यांनाही पाठवले होते पत्र
३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची जयंती झाली. त्या दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवी नगर करण्यात यावे अशी मागणी केली होती त्यांनी यासंदर्भात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्यामुळे नामांतराचा निर्णय ठाकरे सरकराने लवकरात लवकर घ्यावा, अशी मागणी पडळकरांनी केली आहे.
म्हणून केली होती मागणी
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत चौंडीला जात होते. मात्र तेव्हा त्यांना तिकडे जाण्यापासून पोलिसांनी अडवले होते. त्यावेळी चौंडीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि रोहित पवार यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावरून पडळकरांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. त्यांनतर पडळकरांनी अहमदनगरच नाव बदलून अहिल्यादेवी नगर करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.