भारताचा अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान ३’ मोहिमेची तारीख निश्चित झाली आहे. १४ जुलै रोजी दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी एलव्हीएम-३ या प्रक्षेपणयानातून हे यान चंद्राकडे झेपावेल, भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी ही माहिती दिली. सुमारे ३.८४ लाख किमी अंतर कापल्यानंतर, अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहोचतील आणि त्यानंतर २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न करेल. लँडिंग यशस्वी झाल्यास, भारत अशी कामगिरी करणारा अमेरिका, रशिया आणि चीननंतर जगातील चौथा देश होईल.
‘१४ जुलै रौजी प्रक्षेपण झाल्यास ऑगस्टच्या अखेरीस आम्ही चंद्रावर पोहोचू. हे २३ किंवा २४ ऑगस्टला होईल. कारण सूर्य उगवल्यावर चंद्रावर लँडिंग व्हायला हवे. त्यामुळे आम्हाला काम करण्यासाठी पृथ्वीवरचे १४-१५ दिवस मिळतील. या दोन तारखांना लँडिंग होऊ शकत नसल्यास, आम्ही आणखी एक महिना वाट पाहू आणि सप्टेंबरमध्ये प्रस्तावित लँडिंग साइटवर उतरू,’ अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली.
‘आम्ही दक्षिण ध्रुवावर जाऊ शकत नाही, कारण सूर्य दिसणार नाही आणि लँडर आणि रोव्हरची शक्ती तेवढी नाही. आम्ही ७० अंश दक्षिणेकडे जाऊ,’ असे ते म्हणाले. ‘लँडर आणि रोव्हरचे आयुष्य पृथ्वीवरचे १४ दिवस असेल, परंतु ते वाढवता येऊ शकते. पृथ्वीचे १४ दिवस म्हणजे एक चांद्र दिवस. जे चंद्रावरील सूर्योदय आणि सूर्यास्त दरम्यानच्या वेळेनुसार मोजले जातात.
हे ही वाचा:
भारतीय खगोलशास्त्रज्ञ अश्विन शेखर यांच्या नावे ओळखला जाणार ग्रह
खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा स्थगित
ऑस्ट्रेलियात भारतीय विद्यार्थिनीला जिवंत गाडले
खोटी बातमी देणाऱ्या माध्यमाविरोधात पंकजा मुंडे करणार मानहानीचा दावा
“एकदा सूर्यास्त झाला की, लँडर आणि रोव्हरला काम करण्याची शक्ती राहणार नाही आणि सर्व उपकरणे काम करणे थांबवतील. तथापि, आमच्या चाचण्या दर्शवितात की पुढील सूर्योदयाच्या वेळी बॅटरी रिचार्ज होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास, आम्हाला आणखी १४ दिवस किंवा कदाचित त्याहूनही अधिक वेळ मिळू शकेल,’ असे सोमनाथ यांनी स्पष्ट केले.
चांद्रयान २मध्ये केवळ लँडर (चांद्रपृष्ठावर उतरणारे वाहन) आणि रोव्हर (चांद्रपृष्ठावर चालणारे वाहन) होते. चांद्रयान ३ मध्ये या दोन वाहनांखेरीज पोपल्शन (प्रेरक) हे तिसरे वाहन बसवण्यात आले आहे. त्यामुळे चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीवरील वर्णपटासह अन्य निरीक्षणे नोंदवता येतील. रोव्हरच्या हालचालींवर लँडरकडून निरीक्षण केले जाईल. अंतराळ यानाचे वजन तीन हजार ९०० किलो असेल, अशीही माहिती त्यांनी दिली.