भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने म्हणेजच इस्त्रोने गेल्या वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान- ३ उतरवून ऐतिहासिक कामगिरी केली होती. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. चांद्रयान- ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर इस्रोने आता चांद्रयान- ४ च्या मोहिमेची जोरदार तयारी सुरू केली आहे. चांद्रयान- ४ च्या माध्यमातूनही भारत ऐतिहासिक कामगिरी करणार असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे. याबाबत इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी भाष्य केले आहे.
एस सोमनाथ म्हणाले की, “चांद्रयान- ४ चे काही भाग हे दोन प्रक्षेपणांमध्ये पाठवले जातील. हे भाग प्रथम कक्षेत पाठवले जातील आणि नंतर अवकाशात एकत्र केले जातील. याला जर यश आलं तर हे जगात पहिल्यांदाच होणार आहे. चंद्रावर पोहोचण्यापूर्वीच इस्रो इतिहास रचेल. चंद्रावरून नमुने आणणे हे चांद्रयान- ४ चे मुख्य लक्ष्य असणार आहे,” अशी माहिती एस सोमनाथ यांनी दिली आहे.
दोन भाग पाठवणार इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान- ४ एकाच वेळी प्रक्षेपित होणार नाही, तर त्याऐवजी अंतराळ यानाचे वेगवेगळे भाग दोन प्रक्षेपणांद्वारे कक्षेत पाठवले जातील. यानंतर चंद्रावर जाण्यापूर्वी हे वाहन अंतराळात जोडले जाईल. चांद्रयान- ४ ची वहन क्षमता इस्रोच्या सध्याच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटच्या क्षमतेपेक्षा जास्त असेल. इंटरनॅशनल स्पेस सेंटरमधील अनेक एजन्सींनी अंतराळयानाचे भाग एकत्र करण्याचे काम यापूर्वीच केले आहे. पण, इस्रोचा हा प्रयत्न जगात पहिल्यांदाच असेल. कारण याआधी कोणतेही अंतराळ यान स्वतंत्र भागांमध्ये सोडले नाही. या पराक्रमामुळे इस्रो चंद्रावर उतरण्यापूर्वीच इतिहास रचणार आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत दक्षिण आफ्रिकेने मिळवले फायनलचे तिकीट
उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात सर्वाधिक पेपरफुटी!
प्रज्वल रेवण्णाला कोर्टाकडून आणखी एक झटका, जामीन अर्ज फेटाळला!
काँग्रेसने स्वहस्ते केले तोंड काळे…
चंद्रावरून नमुने पृथ्वीवर आणणे हे चांद्रयान- ४ चे लक्ष्य आहे. याआधी चीनने नुकतीच अशी कामगिरी केली आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान इस्त्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले, “चंद्रावरून नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी आम्ही चांद्रयान- ४ ची रचना केली आहे. आम्ही ते अनेक प्रक्षेपणांसह करण्याचा प्रस्ताव देत आहे, कारण आमची सध्याची रॉकेट क्षमता मजबूत नाही. एस सोमनाथ म्हणाले, म्हणून आम्हाला अंतराळात डॉकिंग क्षमतेची गरज आहे.