चांद्रयान- ३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत; १७४ किमी x १४३७ किमी अंतराच्या कक्षेत प्रदक्षिणा

इस्रोकडून ट्वीट करत माहिती

चांद्रयान- ३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत; १७४ किमी x १४३७ किमी अंतराच्या कक्षेत प्रदक्षिणा

भारताची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम असलेल्या चांद्रयान- ३ ने आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. इस्त्रोकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. चांद्रयान- ३ हे आता चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत पोहचले असून हे यान आता १७४ किमी x १४३७ किलोमीटर अंतराच्या लहानशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे.

इस्त्रोने बुधवार, ९ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी यानाच्या ऑर्बिट मध्ये बदल केला. चांद्रयान- ३ च्या थ्रस्टर्सना ऑन करण्यात आले. ५ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहचले होते. तेव्हा चांद्रयानाने चंद्राचा पहिला फोटो देखील पृथ्वीवर पाठवला होता. यानंतर आता थेट १४ ऑगस्ट रोजी यानाची कक्षा बदलण्याची योजना असणार आहे. ११.३० ते १२.३० या वेळेत यान १४ ऑगस्ट रोजी कक्षा बदलणार आहे.

चांद्रयान- ३ पृथ्वीच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करून चंद्राच्या कक्षेत पोहोचले. या दरम्यान चंद्राजवळ प्रदक्षिणा घालताना अंतराळ यानात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने चंद्राचा व्हिडिओ बनवला आणि पृथ्वीवर पाठवला. इस्रोने ट्विटरवर चंद्राची ही पहिली झलक शेअर केली होती. चांद्रयान- ३ हे यान १४ जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले. यानंतर यान पृथ्वीच्या पाच फेऱ्या करून चंद्राकडे रवाना झाले.

भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. भारताची चांद्रयान- ३ ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. या मोहिमेसाठी भारताने तब्बल ६१५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

हे ही वाचा:

‘भारतमातेची हत्या झाल्याच्या राहुल गांधी यांच्या उल्लेखावर काँग्रेसने टाळ्या वाजवल्या

युती ठाकरेंनी तोडली, भाजपाने नाही

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचा कोणताही पुरावा नाही

“आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो” उल्लेख असलेला धमकीचा मेल

चांद्रयान- ३ ही भारताची चंद्राच्या अध्ययानासाठी पाठवलेली तिसरी मोहीम होती. याआधी पाठवलेल्या पहिल्या मोहीमेत भारताला यश आलं होतं, तर दुसऱ्या चांद्रयान मोहीमेच अंतिम टप्प्यात विक्रम लॅंडरचा अपघात झाल्याने ही मोहीम अंशत: अपयशी झाली होती.

Exit mobile version