… आणि काही सेकंदातच १९९२ मध्ये बांधलेला पूल असा झाला इतिहासजमा

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपूल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी हा पूल पाडला जाणार होता.

… आणि काही सेकंदातच १९९२ मध्ये बांधलेला पूल असा झाला इतिहासजमा

मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपूल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी हा पूल पाडला जाणार होता. अखेर शनिवार, १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर १ वाजताच्या सुमारास स्फोट घडवून अगदी काही क्षणांत हा पूल जमीनदोस्त करण्यात आला.

चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडण्याच्या दृष्टीने हा पूल स्फोटकाने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कोची आणि नोएडा येथील ट्वीन टॉवर पाडणाऱ्या कंपनीलाच हा पूल पाडण्याचे काम देण्यात आले होते. याच कंपनीने पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पूल पाडण्याचे काम केले आहे.

पूल पाडण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलिस आणि तांत्रिक पथकाकाडून बंदोबस्त करण्यात येत होता. पूल पाडल्यानंतर आता पुलाचा मलबा हटिवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. काम पूर्ण होईपर्यंत या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच चांदणी चौक आणि परिसरात सकाळपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

चांदणी चौकातील पूल असा पाडण्यात आला

पूल पाडण्यासाठी सुमारे सहाशे किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. पुलावर १ हजार ५०० हजार छिद्रांमध्ये ही स्फोटके भरण्यात आली होती. रात्री उशिरा चांदणी चौकाच्या परिसरातील सर्व भाग निर्मनुष्य करण्यात आला होता. स्फोटाच्या परिसरात ठराविक अधिकारी आणि तांत्रिक पथकाचीच उपस्थिती होती. तांत्रिक पथकाला सूचना मिळताच केवळ काही सेकंदाच्या अंतराने दोन स्फोट घडवून पूल पाडण्यात आला.

स्फोटानंतर धूळ, माती बाहेर उडू नये, यासाठी संपूर्ण पुलाला अच्छादित करण्यात आले. आतील भागामध्ये स्फोटाची तीव्रता कमी करण्यासाठी वाळूच्या गोण्या आणि स्पंजचा वापर करण्यात आला होता. रात्री बाराच्या सुमारास स्फोटकांच्या वाहिन्या मुख्य सर्किटला जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले. शेवटी दहा आकड्यांची उलटी गणना सुरू करण्यात आली आणि दहापासून एक म्हणताच काही सेकंदातच १९९२ मध्ये बांधलेला ३० मीटरचा हा पूल इतिहासजमा झाला.

हे ही वाचा:

ज्येष्ठ अभिनेते अनु कपूर यांची फसवणूक

आणि पंतप्रधान मोदींनी चालवली गाडी

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगेंचे पारडे जड

“5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडणार”

१ हजार ३५० डिटोनेटरच्या सहाय्याने नियंत्रित स्फोटाद्वारे पूल पाडण्यात आला. पूल पाडण्यासाठी आणि मार्ग मोकळा करण्यासाठी १६ एक्स्कॅव्हेटर, चार डोझर, चार जेसीबी, ३० टिप्पर, दोन ड्रिलींग मशीन, २ अग्निशमन वाहन, ३ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर वापरण्यात येत आहेत. पूल पाडण्यापासून रस्ता मोकळा करेपर्यंत साधारण २१० कर्मचारी एनएचएआयतर्फे नियुक्त करण्यात आले आहेत.

Exit mobile version