भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चे सचिव देवजित सैकिया यांनी आयएएनएसला सांगितले की, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकणाऱ्या टीम इंडियासाठी जाहीर केलेल्या ५८ कोटी रुपयांच्या रोख बक्षीसामधून १५ खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना प्रत्येकी ३ कोटी रुपये दिले जातील.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आठ संघांच्या या स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांनी ग्रुप ‘ए’ मध्ये बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत करून अव्वल स्थान मिळवले. त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर, अंतिम फेरीत न्यूझीलंडवर विजय मिळवत ९ मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये भारताने तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
या बक्षिसाची रक्कम त्या खेळाडूंनाही मिळणार आहे, ज्यांनी स्पर्धेदरम्यान एकही सामना खेळला नाही, जसे की अर्शदीप सिंग, ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर.
सैकिया यांनी सांगितले की, इतर प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी – फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि रायन टेन डोशेट, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप, तसेच फिजिओथेरेपिस्ट कमलेश जैन आणि योगेश परमार, संघाचे डॉक्टर आदित्य दफ्तरी, थ्रोडाउन विशेषज्ञ राघवेंद्र द्विगी, नुवान उडेनेक आणि दयानंद गरानी, मसाजर चेतन कुमार, राजीव कुमार आणि अरुण कानाडे, आणि कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई यांना प्रत्येकी ५० लाख रुपये दिले जातील.
याशिवाय, बीसीसीआयशी संबंधित अन्य अधिकारी, जसे की व्हिडिओ विश्लेषक हरीप्रसाद मोहन, लायझन अधिकारी आणि मीडिया मॅनेजर यांना प्रत्येकी २५ लाख रुपये मिळतील.
बीसीसीआय सचिवांनी सांगितले की, निवड समितीचे अध्यक्ष अजित अगरकर यांना ३० लाख रुपये तर अन्य सदस्य – सुब्रतो बॅनर्जी, अजय रात्रा, एस. शरत आणि शिव सुंदर दास यांना प्रत्येकी २५ लाख रुपये दिले जातील.
सैकिया यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) विजेत्या भारतीय संघाला सुमारे १९.४५ कोटी रुपये बक्षीस दिले असून, ती रक्कम केवळ खेळाडूंमध्ये वाटली गेली. प्रत्येक खेळाडूला १.४३ कोटी रुपये मिळाले.
हेही वाचा :
रेनॉल्टची वाहनं एप्रिलपासून महागणार!
भारताच्या ताब्यात न येण्यासाठी राणाची तडफड सुरूचं; स्थगितीसाठी मुख्य न्यायाधीशांकडे अर्ज
भारतीय विद्यार्थी बदर खान अमेरिकेत करत होता हमासचा प्रचार; केली अटक
नागपूर हिंसाचार प्रकरणाचा मास्टरमाइंड फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा
बीसीसीआयने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात सैकिया म्हणाले, “खेळाडूंना आणि सहयोगी स्टाफला हे बक्षीस देणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आणि रणनीतीमुळे भारत आज जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. हा विजय भारतीय संघाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील वर्चस्वाचा पुरावा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की संघ भविष्यात आणखी मोठ्या यशाची कमाई करेल.”
ते पुढे म्हणाले, “खेळाडूंनी दाखवलेली निष्ठा आणि समर्पण हे एक नवे मानक निर्माण करते. आम्हाला खात्री आहे की भारतीय क्रिकेट जागतिक स्तरावर आपल्या कामगिरीची उंची वाढवत राहील.”