आंध्र प्रदेशातून चंद्र प्रदेशात; उद्या चांद्रयान ३ घेणार झेप

मोहीम सफल झाल्यास भारत होईल अंतराळ क्षेत्रातील चौथी महाशक्ती

आंध्र प्रदेशातून चंद्र प्रदेशात; उद्या चांद्रयान ३ घेणार झेप

चांद्रयान ३ चे प्रक्षेपण शुक्रवारी दुपारी अडीच वाजता करण्याचे प्रस्तावित आहे. या मोहिमेंतर्गत लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर २३ किंवा २४ ऑगस्टला उतरेल. प्रक्षेपणासंदर्भात मंगळवारी अभ्यास करण्यात आला. गुरुवारी काउंटडाऊन सुरू होत असून श्री हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावर मोहिमेच्या तयारीचे विश्लेषण पूर्ण झाले आहे. इस्रोच्या बोर्डानेही प्रक्षेपणाची मंजुरी दिली आहे. या मोहिमेत भारत यशस्वी झाल्यास असे करणाऱ्या अमेरिका, रशिया आणि चीनच्या पंक्तीत जाऊन बसेल.

भारताच्या चांद्रयान २ मोहिमेमध्ये लँडर (चांद्रस्थानक) चंद्रावर सुरक्षित उतरण्यात यशस्वी झाले नव्हते. यावेळी चांद्रयान ३ मोहिमेत लँडर विक्रम आणि त्यामध्ये असणाऱ्या प्रज्ञान रोव्हरला(स्वयंचलित वाहन) चंद्रावर उतरवले जाणार आहे. शुक्रवार, १४ जुलै रोजी रॉकेट लाँच व्हेइकल मार्क – ३ (एलव्हीएम ३)च्या माध्यमातून रॉकेटच्या साहाय्याने प्रक्षेपण केले जाईल. प्रक्षेपणानंतर चांद्रयान ३ पृथ्वीभोवती पाच ते सहा वर्तुळाकार परिक्रमा करेल.

या दरम्यान चांद्रयान पृथ्वीपासून किमान १७० किमी अंतरावर आणि कमाल ३६ हजार ५०० किमी अंतरापर्यंत असेल. या दरम्यान जो वेग यानाला प्राप्त होईल, तो त्याच्या एक महिन्याच्या प्रवासासाठी आवश्यक आहे. तो चंद्राच्या १०० किमी उंच कक्षेपर्यंत पोहोचेल. चंद्राभोवतीही वर्तुळाकार परिक्रमा करून हे यान एक निर्धारित स्थिती प्राप्त करेल. त्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची क्रिया सुरू होईल. पृथ्वी आणि चंद्र १४ जुलै रोजी अन्य दिवसांच्या तुलनेत अधिक जवळ असल्याने चांद्रयानाच्या प्रक्षेपणासाठी या दिवसाची निवड केली गेली आहे. तसेच, उत्तर ध्रुवाच्या तुलनेत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी मिळण्याची शक्यता अधिक असल्याने हे यान येथे उतरवले जाणार आहे.

हे ही वाचा:

बच्चू कडू मंत्रिपदाचा दावा सोडणार होते, पण मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे थांबले

दुबई, ऑस्ट्रेलियामधील किमतीत भारतात टोमॅटोंची विक्री

नेमकं खोटं कोण बोललं शरद पवार की ठाकरे?

राज्यातील प्रत्येक बालकांचा सर्वांगीण विकास करण्यावर भर : महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

१४ जुलै रोजी दुपारी दोन वाजून ३५ मिनिटांनी चांद्रयानाचे श्री हरीकोटाच्या दुसऱ्या लाँचपॅडवरून प्रक्षेपण होईल. त्यानंतर १६ मिनिटांमध्ये एलव्हीएम-३ रॉकेटमधून चांद्रयान-३ विलग होऊन पृथ्वीभोवती १७० बाय ३६५०० किमीची दीर्घवर्तुळाकार व कक्षा प्राप्त करेल. पुढील काही दिवसांत यानाच्या पृथ्वीभोवतीच्या कक्षेचा विस्तार करण्यात येईल. या प्रक्रियेतून यानाची गती वाढेल. वाढलेल्या गतीचा उपयोग करून यान चंद्राच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येईल.

प्रोपत्जन मॉडेलच्या साहाय्याने चंद्राजवळ पोचल्यावर यान चंद्राभोवती दीर्घवर्तुळाकार कक्षेत सोडण्यात येईल. दीर्घवर्तुळाकार कक्षा टप्प्याटप्प्याने कमी करून अंतिमत: चांद्रयान ३ ला चंद्राभोवती १०० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. २३-२४ ऑगस्टला किंवा सप्टेंबर अखेरीस प्रोपत्जन मॉड्युलपासून विलग झालेले लँडर चंद्रावर निश्चित केलेल्या ठिकाणाकडे टप्प्याटप्प्याने उतरवण्याची प्रक्रिया पार पडेल.

Exit mobile version