पिटबुल, रॉटवीलर, अमेरिकन बुलडॉग आणि अन्य धोकादायक जातीच्या श्वानांवर बंदी घालण्याची शिफारस केंद्र सरकारने केली आहे. केंद्र सरकारने बुधवारी या संदर्भात राज्ये आणि केंद्र सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार, अशा जातींच्या श्वानांच्या विक्रीवर तसेच, प्रजननावर बंदी घालावी अशी सूचना केली आहे. तसेच, बेकायदा झुंज आणि हल्ल्यासाठी वापरले जाणारे या जातीचे परदेशी श्वान ठेवण्यास बंदी घालावी, अशी शिफारसही केंद्र सरकारने केली आहे.
मानवाला धोकादायक असणाऱ्या पिटबुल आणि अन्य जातीच्या श्वानांची विक्री, प्रजनन आणि त्यांना ठेवण्यासाठी कोणताही परवाना अथवा परवानगी दिली जाऊ नये, असे निर्देश पशु संवर्धन मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. अशा जातीच्या श्वानांच्या आयातीवरूनही बंदी घालण्याची शिफारस पशुसंवर्धन मंत्रालयाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तज्ज्ञांच्या समितीने केली आहे.
हे ही वाचा:
अदानी उद्योगाच्या समभागांचे एका दिवसात एक लाख कोटीचे नुकसान!
“नागरिकत्व दुरुस्ती कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही”
“अल्पसंख्याकांच्या मतांसाठी उद्धव ठाकरेंकडून ‘सीएए’वर राजकारण सुरू”
गडकरी, मुनगंटीवार, पंकजा मुंडे, मोहोळ यांना लोकसभेचे तिकीट!
प्राण्यांच्या हक्कासाठी आणि संरक्षणासाठी लढणाऱ्या पेटा या संस्थेनेही या संदर्भात केंद्र सरकारकडे दाद मागितली होती. अनेक ठिकाणी श्वानांमध्ये बेकायदा झुंज लावली जाते, त्यातून श्वानांचे शोषण होते. तसेच, काही जातींच्या श्वानांच्या हल्ल्यांत लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक जखमी झाले असल्याकडे ‘पेटा’ने लक्ष वेधले होते. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. मानव आणि श्वान या दोघांच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अनेक ठिकाणी बेकायदा झुंजीत या श्वानांचा वापर केला जातो किंवा त्यांना जड अशा साखळदंडात जखडले जाते, याकडे भारतातील पेटा संस्थेच्या शौर्या अग्रवाल यांनी लक्ष वेधले.
देशभरात पिटबुल आणि समकक्ष जातीच्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीत नुकतेच एका लहान मुलाला पिटबुल जातीच्या श्वानाने चावा घेला होता. त्यामुळे या मुलाला तब्बल १७ दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. एक माणूस त्याच्या पिट बुल श्वानाला शेजाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी उकसवत असे. तर, गाझियाबादमध्ये एका पिटबुल जातीच्या श्वानाने १० वर्षीय मुलाला जखमी केले होते.
पिट बुल, टोसा इनू, अमेरिकन स्टाफोर्डशायर टेरिअर, फिला ब्रेझिलेरिओ, डोगो अर्जेंटिनो, अमेरिकन बुलडॉग, बोरबोएल, कन्गल, टोर्न्जक, बॅनडॉग, सरप्लॅनिनॅक, जापनीज टोसा, अकिता, मास्टिफ्स, रॉटवीलर्स, ऱ्होडेसिआन रिजबॅक, वुल्फ डॉग्ज, कॅनॅरिओ, अकबॅश आणि मॉस्को गार्डडॉग यांच्यावर बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे.