मध्य रेल्वेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील १३ पादचारी पूल नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलांपैकी तीन पूल ब्रिटीशकालीन असून २०१९ च्या आयआयटी मुंबईने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये हे तीनही पूल असुरक्षित म्हणून घोषित करण्यात आले होते. स्ट्रक्चरल ऑडीटच्या अहवालानुसार असुरक्षित पुलांचे दुरुस्तीचे काम मध्य रेल्वेने तातडीने हाती घेतले होते. सध्या सर्व पादचारी पूल सुस्थितीत आहेत. मात्र भविष्याचा विचार करून आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे १३ पूल नव्याने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील या पादचारी पुलांचे काम मध्य रेल्वे करणार असून त्यासाठीचा निधी महापालिका देणार आहे. २०१९ मध्ये मध्य रेल्वेने १३ पादचारी पुलांचे बांधकाम करण्यासाठी पालिकेकडे निधीची मागणी केली होती. पालिकेने पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपये देऊन मध्य रेल्वेला कामाची सुरुवात करण्यास सांगितले. परंतु इतका निधी काम सुरू करण्यासाठीही पुरेसा नसल्याने पालिकेकडे अजून निधीची मागणी केली असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानातून जवळपास ४०० जणांना आणले भारतात
‘खत्री’लायक कामगिरी; जागतिक अॅथलेटिक्समध्ये रौप्यपदक
मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्यावर फिरला बुलडोझर, सोमैय्या म्हणतात ‘पुढचा नंबर…’
लस नाही म्हणता म्हणता महाराष्ट्रात विक्रमी लसीकरण
स्ट्रक्चरल ऑडीटनुसार पुलांच्या दुरुस्तीचे काम झाले आहे, पण काही पुलांचे आयुष्य संपले असून त्यांची नव्याने बांधणी होणे आवश्यक आहे. डॉकयार्ड आणि रे रोड स्टेशन दरम्यान असलेला गनपावडर पादचारी पूल हा १९२३ मध्ये बांधलेला होता. तसेच १९१५ मध्ये बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद या स्टेशनदरम्यानचा भंडारी पूल आणि १९२२ चा मस्जिद स्टेशनजवळील पूल नव्याने बांधण्याची गरज आहे, असे स्ट्रक्चरल ऑडीटमध्येही सुचवण्यात आले होते. पुलांच्या नव्याने बांधणीच्या विषयात पालिकाही लक्ष घालत आहे, असे वरिष्ठ अभियंता सतीश ठोसर यांनी सांगितले.
२०१८ मध्ये झालेल्या अंधेरी येथील दुर्घटनेनंतर तेव्हाचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी पादचारी पूल, रेल्वे रुळांलगतचे पूल अशा सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश दिले होते. आयआयटी मुंबईने मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत स्ट्रक्चरल ऑडीट केले होते.