महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटच्या विक्रीला बंदी केली आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
हे ही वाचा:
मुंबईत उपलब्ध होणार हरित उर्जेचा पर्याय
महाराष्ट्रात तीन आठवड्याचा कडक लॉकडाऊन?
आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही
रेल्वेच्या या सुचनांची अंमलबजावणी तात्काळ शुक्रवार रात्रीपासून केली जाणार आहे.
“फलाटावर निष्कारण होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच सोशल डिस्टन्सिगचे योग्य पालन व्हावे या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.” असे मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी पीटीआयसोबत बोलताना सांगितले.
यापूर्वी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांचा दर वाढवला होता. मुंबई मंडल, नागपूर मंडल आणि भुसावळ मंडल याठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्याद्वारे गर्दी टाळण्याचा प्रयत्न रेल्वेद्वारे करण्यात आला होता.
कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता, रेल्वे प्रवासावर देखील निर्बंध आणले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मर्यादित काळासाठी सामान्य माणसाला रेल्वे प्रवासाची मुभा आहे, परंतु तिच्यावर देखील टांगती तलवार आहे.
ठाकरे सरकारने कोरोनाच्या प्रभावाला आळा घालण्यासाठी कडक निर्बंधांच्या नावाखाली सध्या राज्यभरात जवळपास टाळेबंदी सदृश परिस्थिती निर्माण केली आहे.