देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातले

देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातले

महाराष्ट्रात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येवर केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. देशात सध्या होत असलेल्या रुग्णवाढीत पंजाब आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा वाटा सर्वाधिक आहे. तर भारतातील १८ राज्यांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली. यावेळीच महाराष्ट्रात दिवसागणिक वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येबाबतही चर्चा करण्यात आली.

देशात कोविड रुग्णांची जी वाढ होत आहे त्यात महाराष्ट्र राज्य क्रमांक १ ला आहे. महाराष्ट्रात रोज कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक होताना दिसत आहे. देशभरातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या १० जिल्ह्यांपैकी ९ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यात पुणे जिल्हा क्रमांक एक ला आहे. पुणे व्यतिरिक्त नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील या नऊ जिल्ह्यांव्यतिरिक्त कर्नाटकातील बंगलोर अर्बन जिल्ह्याचा सर्वाधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये समावेश आहे.

हे ही वाचा:

आंतरराष्ट्रीय उड्डाणांना एप्रिल पर्यंत स्थगिती

वाझे ठरतोय लादेन मार्गी

प्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर

देशात सध्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्णही आढळून आले आहेत. यात युके, ब्राझील आणि साऊथ आफ्रिकेच्या स्ट्रेनचे रुग्ण आहेत. नव्या स्ट्रेनचे एकूण ७७१ रुग्ण असून यात ७३६ हे युके व्हेरियंटचे, ३४ साऊथ आफ्रिकन व्हेरियंटचे तर १ रुग्ण हा ब्राझील व्हेरियंटचा आहे. भारतातील १८ राज्यात हे नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले आहेत. देशात मृत झालेल्या रुग्णांपैकी ८८% रुग्ण हे वयवर्षे ४५ पेक्षा वरचे होते अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

देशातील ही कठीण परिस्थिती लक्षात घेता सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी वेगवेगळे सण सार्वजनिकपणे साजरे करण्यावर स्थानिक पातळीवर निर्बंध घालावेत अशी सूचना केंद्राकडून करण्यात आली आहे.

Exit mobile version