भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी आकाशवाणीतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मुंबईत दोन दिवसांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत तसेच भारतीय संगीत प्रकारांमध्ये पंडित भीमसेन जोशी यांनी आपला अमिट ठसा उमटवला आहे. किराणा घराण्याचे गायक असणाऱ्या पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म कर्नाटकातल्या गदग जिल्ह्यात १९२२ मध्ये झाला. लहानपणापासूनच गाण्याची आवड असलेल्या भीमसेन जोशी यांचे गाण्याचे शिक्षक विख्यात गायक सवाई गंधर्व यांच्याकडे झाले. त्याशिवाय सूरश्री केसरबाई केरकर या देखील त्यांच्या गुरू होत्या. ख्याल, भजने, अभंग अशा सर्व प्रकारच्या गायकी हाताळणाऱ्या पंडित भीमसेन जोशी यांना १९७२ मध्ये पद्मश्री, १९८५ मध्ये पद्म भूषण, १९९९ मध्ये पद्म विभूषण आणि २००८ मध्ये भारतरत्न असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. भीमसेन जोशी यांची ‘जो भजे हरि को सदा’ ‘इंद्रायणी काठी’ ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ ‘माझे माहेर पंढरी’ इत्यादी अनेक गाणी, कित्येक रागांचे ख्याल प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांचे ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ हे गाणे प्रसिद्ध आहे.
भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांचे अनेक शिष्य संगीतक्षेत्रात त्यांचा स्वतंत्र छाप उमटवत आहेत. जयतीर्थ मेवुंडी, आनंद भाटे इत्यादी त्यांचे अतिशय नामांकित शिष्य आहेत.