लता दीदी अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

लता दीदी अनंतात विलीन; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने एका स्वर युगाचा अस्त झाला आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे लता दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गानकोकिळा लता मंगेशकर अनंतात विलीन झाल्या आहेत.

लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. तीनही सैन्यदलाकडून लता दीदी यांना मानवंदना देण्यात आली. लता दीदी यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला.

वयाच्या ९२ व्या वर्षी लता मंगेशकर यांनी मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांचे पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच प्रभुकुंज येथे नेण्यात आले होते. त्यानंतर सैन्याच्या गाडीतून त्यांचे पार्थिव मुंबईतील शिवाजी पार्क येथे नेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दीदींना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. पंतप्रधान मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करून लता दीदींना श्रद्धांजली वाहिली.

हे ही वाचा:

….आणि हेमा झाली स्वरकोकिळा लता मंगेशकर

हृदयाची तार छेडणारा तारा निखळला

लता दीदींच्या निधनाने बॉलीवूडमध्ये शोककळा

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.  त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी सिनेसृष्टीतील, संगीत क्षेत्रातील आणि राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, सुप्रिया सुळे, अमित ठाकरे, किशोरी पेडणेकर, विनोद तावडे, अभिनेता शाहरुख खान, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेता रणबीर कपूर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version