जगी सर्वमुखी असा तूच आहे!

वडापाव दिवसानिमित्त

जगी सर्वमुखी असा तूच आहे!

२३ ऑगस्ट हा दिवस वडापाव दिवस म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्ताने वडापावला लिहिलेले पत्र

तुझ्या नावाने हा दिवस कुणी सुरू केला माहीत नाही, पण खरं सांगायचं झालं तर प्रत्येक दिवस हा तुझाच असतो. देव जसा यत्र तत्र सर्वत्र आहे तसा तू ‘सर्वमुखी’ आहेस. एखाद्या हातगाडीवर तो खमंग वास येऊ लागला की, मन कासावीस होतं. तुझी केव्हा एकदा तोंडओळख होतेय असं वाटू लागतं. पाय त्या हातगाडीकडे वळतात आणि हात तुला अलगद उचलण्यासाठी सरसावतात. पावाला सुरीने कापून तुझी प्रतिष्ठापना त्यात झाली, चटणीचा अभिषेक झाला की, हात आपोआपच जोडले जातात. त्या हातात तू असतोस आणि पहिल्या घासासोबत मिळणाऱ्या तृप्तीमुळे डोळे मिटतात. मग तू आणि आम्ही एवढेच विश्व असते.

तुझ्यासमोर सगळेच सारखे. लहान-थोर, स्त्री पुरुष, गरीब-श्रीमंत. कोणताही वयोगट असो, कोणताही जाती-धर्म असो तो तुला मानतो. अनेकांना तू तुझ्यादेखत मोठे होताना पाहिलेस. त्यांच्या संघर्षाच्या दिवसांत तू त्यांच्या सोबत होतास. विशेष म्हणजे मोठे झाल्यावरही तुझी साथ त्यांनी सोडली नाही. अनेकांचा चरितार्थ तू चालवलास. एखादी छोटी गाडी घेऊन वडापाव विकणाऱ्या अशा अनेकांनी प्रगतीचे इमले बांधले, अनेकांची पोटापाण्याची व्यवस्था झाली. पण इतक्या वर्षांत तू कधी हॉटेलच्या प्लेटमध्ये दिसला नाहीस. तू नेहमी ‘रस्त्यावरची’ आंदोलने करत राहिलास.

हे ही वाचा:

बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान

‘मुख्यमंत्रीपद मागण्याचा शिवसेनेला अधिकारच नव्हता’

विधानभवनाजवळ शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबईतल्या ललित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

 

तुझी अनेक रूपे इतक्या वर्षांत पाहिली. कधी तिखट, कधी गोडसर, कधी मोठा, कधी लहान, कधी चीजसोबत तर कधी बटरसोबत. तरीही तू आहे तसाच राहिलास. आता तर परदेशातही तुझे चाहते झालेत. दुबईतही तू आहेस अमेरिकेतही. मराठी माणसासोबत तू परदेशात गेलास आणि तिथे स्थायिकही झालास.

१० पैशापासून तुझी सुरुवात झाली. आज तुझ्यासाठी २०-२५ रुपयेही मोजले जातात. पण कुणीही किंमत ऐकून पाठ फिरवत नाही. शेवटी पोटाचा प्रश्न असतो. तुझे आम्हाला व्यसन लागले आहे. प्रत्येक सणासुदीला वेगवेगळे पदार्थ आम्ही बनवतो. पण तू असा एकमेवाद्वितीय आहेस की, वडापाव येता घरा, तोचि दिवाळी दसरा अशी आमची अवस्था होऊन जाते. एवढे आम्ही तुझे जबरदस्त फॅन आहोत. पण आमची काय गोष्ट. अरे, दस्तुरखुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तुझा फॅन आहे. हेवा वाटतो तुझा.

महाराष्ट्राबद्दल राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा असे अभिमानाने आम्ही म्हणतो. गोविंदाग्रजांची माफी मागून त्यात आता ‘वडापावच्या देशा’ अशी भर घालायला हरकत नाही.

तुला ‘वाढदिवसा’च्या खूप शुभेच्छा!

Exit mobile version