माझ्या“प्रिय बंधूनो आणि भगिनींनो” अशी भाषणाला सुरवात करताच भरगच्च भरलेल्या सभागृहात अखंड दहा मिनिटे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता,आणि सर्व प्रेक्षक फक्त त्या भाषण करणाऱ्या व्यक्तीकडे नजर लावून होते. ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वामी विवेकानंद होते अर्थात नरेंद्र विश्वनाथ दत्त. पुत्र व्हावा ऐसा ,ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या प्रमाणेच स्वामीजी होते.स्वामी विवेकानंद यांनी धर्मप्रसारासाठी ‘सर्व धर्म परिषदे’च्या निमित्ताने भारताचे प्रतिनिधी म्हणून अमेरिकेतील शिकागो येथे गेले होते. तेव्हा त्यांनी ती धर्मपरिषद श्रोत्यांची मने जिंकून ‘न भूतो न भविष्यति!’ असा विलक्षण प्रभाव स्वतःबरोबरच आपल्या देशाचाही निर्माण केला.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी १८६३ साली कलकत्ता येथे झाला. स्वामीजी इतके उत्साही आणि तेजस्वी होते की त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. त्यांनी तरुणांच्या हृदयात आपले कार्य करण्याची जी ज्योत लावली ती आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्त्रोत आहे.
भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली स्वामी विवेकानंद यांची आज जयंती त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण आजचा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करतो.ब्रिटिश राजवटीत हिंदू धर्माच्या विचारसरणीच पुनर्निर्माण करण्यासाठी आणि देशभरांत राष्ट्रीय उत्साहाला प्रेरणा देण्यासाठी स्वामी विवेकानंद जगभरात प्रसिद्ध आहेत. स्वामीजींचे विचार कालबद्ध नसून अनेक पिढ्यांसाठी आदर्शच आहेत.
स्वामीजींकडे एकदा एक गृहस्थ आले आणि म्हणाले, “महाराज, मला वाचवा. माझ्यातील दुर्गुणांमुळे माझे जगणे नरकमय झालेले आहे. मी कितीही प्रयत्न केले तरी वाईट सवयी काही सुटत नाहीत. त्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा” अशी विनवणी ते गृहस्थ करू लागले. त्या गृहस्थांशी काहीही न बोलता विवेकानंदांनी आपल्या एका शिष्याला बोलावून त्याच्या कानात काहीतरी सांगितले.थोड्या वेळाने त्या गृहस्थांना घेऊन ते बागेत फिरायला गेले.वाटेत पहातात तर काय, एक शिष्य एका झाडाला मिठी मारून बसला आहे आणि सारखा अरे, मला सोड, मला सोड’, असे म्हणून झाडाला लाथा मारत आहे. झाडाला तर त्यानेच धरून ठेवले होते.हे पाहून ते गृहस्थ हसू लागले आणि म्हणाले, “महाराज, काय वेडा माणूस आहे. स्वत:च झाडाला धरले आहे आणि वर स्वतःच `मला सोड, मला सोड’, असे म्हणत आहे. मला तर तो वेडाच वाटतो.” विवेकानंदजी हसले आणि त्यांना म्हणाले, “तुमची अवस्था पण अशीच आहे, असे तुम्हाला वाटत नाही का ? दुर्गुणांना तुम्हीच धरून ठेवले आहे आणि ते सुटत नाहीत म्हणून तुम्ही ओरड करता आहात .” हे ऐकून ते गृहस्थ थोडे ओशाळले.
थोडे पुढे चालून गेल्यावर एक माळी झाडांना खत घालीत असलेले त्यांनी बघितले ,खताला दुर्गंध येत होता. त्या गृहस्थांनी नाकाला रुमाल लावला. विवेकानंद हसले. थोडे पुढे गेले. अनेक झाडांवर वेगवेगळी फुले उमललेली होती. त्यां फुलांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. ते गृहस्थ श्वास भरभरून सुगंध घेऊ लागले. त्यांचे मन प्रसन्न झाले. स्वामीजी अजूनही स्मित हास्य करीत होते. त्या गृहस्थांना थोड आश्चर्यच वाटल. `हा माणूस वेडा तर नाही ना ? मी केवढी गंभीर समस्या घेऊन आलो आहे आणि हा तर हसतो आहे. आपली थट्टा तर करीत नाही ना ?’ असा विचार त्यांच्या मनात आला. शेवटी त्यांनी विवेकानंदांना विचारले, “महाराज, आपण का हसता आहात ? माझे काही चुकले का ?” विवेकानंद म्हणाले, “या वनस्पती, फुलेझाडे मानवाच्या दृष्टीने कितीतरी अप्रगत, मागासलेली आहेत; पण तीदेखील मिळणार्या खताच्या दुर्गंधीचे रूपांतर सुगंधात करतात. सर्वांना तो सुगंध वाटतात अगदी काहीही हातचे राखून न ठेवता! पण एवढ्या प्रगल्भ बुद्धीचा विकसित मानव मात्र आपल्या दुर्गुणांचे सद्गुणात रूपांतर करू शकत नाही. ही फुले कोणत्याही परिस्थितीत, डोलतांना, हसतांना, अगदी खुडून घेतली तरीही सुगंध पसरवितात. आपला गुणधर्म सोडत नाहीत; पण माणूस मात्र जराशा परिस्थितीने दोलायमान होतो.” हे ऐकून ते गृहस्थ वरमले. त्यांना आपली चूक कळली. ते समाधानाने स्वामीजींचा निरोप घेऊन बाहेर पडले.
स्वामी विवेकानंदांना “भारताचे राष्ट्रीय संत” म्हटल जातं तरुणांनी स्वामीजींनी दाखविलेल्या मार्गावर चालाव ,यामुळे समाजाचे आणि देशाचे कल्याण तर होईलच पण त्या व्यक्तीचे जीवनही सुधारेल. राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याचा उद्देश भारतातील तरुणांना राष्ट्र उभारणीसाठी प्रोत्साहित करणे, संघटित करणे, प्रेरणा देणे आणि सक्रिय करणे हा आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुणांना या महोत्सवात सहभागी करून घ्यायचे उद्दिष्ट
असून स्थानिक आणि जागतिक स्तरावर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, जेणेकरून या तरुण पिढीमुळे आपण भविष्यात एक चांगला भारत घडवू शकतो.
हे ही वाचा:
आरेनंतर आदित्य यांची रेसकोर्ससाठी हाळी?
महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करा!
…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी
म्हाडा टेंडरच्या वादातून कुर्ल्यात गाडीवर केला गोळीबार
१९८५ पासून, राष्ट्रीय युवा दिन म्हणजेच १२ जानेवारी हा रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनच्या मुख्यालयात तसेच त्यांच्या शाखा केंद्रांवर स्वामीजींप्रती असलेला आदर मोठ्या भक्तीने साजरा केला जातो. या दिवशी अनेक ठिकाणी मंगल आरती, होम, ध्यान, भक्तिगीते, धार्मिक प्रवचन आणि संध्या आरतीचे आयोजन केले जाते. देशातील जवळपास सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यावर्षी राष्ट्रीय युवा महोत्सव हुबळी आणि धारवाड शहरांत होणार असून यामध्ये देशभरातील ७५०० पेक्षा अधिक तरुण सहभागी होणार आहेत.
ब्रिटीश राजवटीत हिंदू धर्माच्या विचारसरणीच पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि देशभरात राष्ट्रीय उत्साहाला प्रेरणा देण्यासाठी स्वामी विवेकानंद जगभरात प्रसिद्ध आहेत.स्वामी विवेकानंदांची शिकवण आणि तत्वज्ञान कालबद्ध नाही आणि पुढच्या अनेक तरुण पिढ्यांसाठी त्यांच्या विचारांचा विचार केला जाऊ शकतो आपल्या प्रखर साधनेमुळेच मरगळलेल्या समाजाला दिशा देऊ शकले. आजही कन्याकुमारी येथे असलेले स्वामी विवेकानंदांचे स्मारक त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची ग्वाही देते.