कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणाची तपासणी सध्या सिबीआय करत आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रायची पॉलीग्राफी चाचणी करण्यास सीबीआयला परवानगी दिली आहे. मंगळवार (२० ऑगस्ट) रोजी आरोपी संजयची लाय डिटेक्टर किंवा पॉलीग्राफी चाचणी घेण्यात येणार आहे. दुसरीकडे, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या भीषण बलात्कार आणि हत्येच्या तपासाची जबाबदारी आपल्या दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे.
सीबीआयच्या अतिरिक्त संचालक संपत मीणा आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक सीमा पाहुजा यांच्याकडे या प्रकरणाची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला अधिकारी संपत मीणा यांनी २०२० मधील हातरस बलात्कार-हत्या प्रकरण आणि २०१७ मधील उन्नाव बलात्कार प्रकरण यासारख्या उच्च-प्रोफाइल प्रकरणांचे नेतृत्व केले आहे. तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सीमा पाहुजा याही हातरस प्रकरणातील तपास पथकाचा भाग होत्या.
हे ही वाचा :
कासीम पठाणच्या छळास कंटाळून तरुणीची आत्महत्या
कोलकाता पीडितेचा मृतदेह पालकांकडे देण्यास वेळ का लागला?
पोर्शे कार अपघात; रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दोघांना अटक
“बदलापूर अत्याचार प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही”
संपत मीणा या झारखंडमधील १९९४ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. उन्नाव बलात्कार प्रकरण आणि उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरण त्यांनी यशस्वीपणे हाताळले होते. मीना या सीबीईच्या अतिरिक्त संचालक म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणात मदत करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या सीमा पाहुजा या अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेत. अधिकारी सीमा पाहुजा ग्राउंड लेव्हलवर तपास करतील. २००७ ते २०१८ या कालावधीत उत्कृष्ट तपासासाठी सीमा पाहुजा यांना दोनदा सुवर्णपदक मिळाले आहे. सीमा पाहुजा यांनी काही वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार-हत्येची उकल केली होती.