शिवसेना (उद्धव गट) यांच्या मुखपत्र “सामना” च्या संपादकीयमध्ये “हिंदू तालिबान” या शब्दप्रयोगावरून मोठा वाद उफाळला आहे. या प्रकरणी ॲड. शेखर त्र्यंबक जोशी यांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलीस ठाण्यात “सामना”चे संपादक उद्धव ठाकरे, कार्यकारी संपादक संजय राऊत आणि प्रकाशक सुभाष देसाई यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार जोशी यांनी आरोप केला आहे की, सामना च्या संपादकीयमध्ये “हिंदू तालिबान” हा शब्द वापरून हिंदू समाजाचा अपमान केला गेला असून त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
विवादाचे मूळ कारण काय?
महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर “सामना” च्या संपादकीयमध्ये हिंदुत्वाच्या एका विचारसरणीवर टीका करताना “हिंदू तालिबान” हा शब्दप्रयोग करण्यात आला. हिंदू संघटनांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला असून, हा हिंदू धर्माचा अपमान असल्याचा आरोप केला आहे.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेश: औरंगजेबाची कबर फोडणाऱ्याला ५ बिघा जमीन, ११ लाख रुपये देणार!
‘काँग्रेसच्या सत्तेत मणिपूर जळत राहिला, पण काँग्रेसने लक्ष दिले नाही’
इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या सरकार प्रमुखासह अनेक उच्च अधिकारी ठार
मार्चच्या अखेरीस ओडिशात होणार राष्ट्रीय खोखो स्पर्धा
ॲड. जोशी यांनी म्हटले आहे की, “”सामना” वृत्तपत्राने हेतुपुरस्सर हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘हिंदू तालिबान’ असा उल्लेख करून हिंदू समाजाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रकार असह्य आहे, आणि आम्ही यावर कठोर कारवाईची मागणी करत आहोत.” खामगाव शहर पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेतली असून चौकशी सुरू केली आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणतीही FIR दाखल झाल्याची माहिती नाही.
महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वाढता तणाव
सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. काही संघटनांनी “औरंगजेबाची कबर हटवावी” अशी मागणी केली आहे, तर काही गटांनी त्यास विरोध दर्शवला आहे. यामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाला असून, सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.