अधिक काम करण्यासाठी ‘केदारनाथ’ यात्रेतील ”खेचरांना देतात गांजा” !

व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडून संताप

अधिक काम करण्यासाठी ‘केदारनाथ’ यात्रेतील ”खेचरांना देतात गांजा” !

‘केदारनाथ यात्रेच्या’ खडतर प्रवासात अनेकदा यात्रेकरू किंवा अवजड माल वाहून घेऊन जाण्यासाठी खेचरांची मदत घेतली जाते. मात्र याच खेचरांना अधिक काम करता यावे, त्यांच्या संवेदना बधीर व्हाव्यात, यासाठी त्यांना ‘गांजा’ दिला जात असल्याचे व्हीडिओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या व्हिडीओंखाली नेटिझन्सने संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इंस्टाग्रामवरील अशाच एका पोस्टमध्ये, एक व्हिडिओ आहे. त्यामध्ये घाबरलेल्या एका खेचराला त्याच्या नाकातून सिगारेटमध्ये भरलेल्या घटकांचा श्वास घेण्यास भाग पाडले जात असल्याचे दाखवले आहे. एक व्यक्ती, कदाचित ती त्या खेचराची मालक आहे, त्याने त्या प्राण्याचे तोंड बंद केले आहे. जेणेकरून खेचर सिगारेटमधील घटक श्वासावाटे आत घेईल. उत्तराखंड पोलिसांनी दोन्ही व्हिडिओंची दखल घेऊन शनिवारी खेचराचा मालक राकेश सिंग रावत याला केदारनाथ मंदिर असलेल्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातून अटक केली. रावत यांच्यावर आयपीसी आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडीओची तपासणी केल्यानंतर गुन्हा नोंदवल्याची माहिती सोनप्रयाग पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुरेशचंद्र बलूनी यांनी दिली. केदारनाथ यात्रेच्या मार्गावर येणाऱ्या छोटी लिंचोली परिसरात थारू कॅम्प येथे ही घटना घडली होती. आरोपीचा माग काढून त्याला अटक करण्यात आली. ‘विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि दिया मिर्झा यांसारख्या सेलिब्रिटींसह सुमारे १६ लाख फॉलोअर्स असलेल्या इंस्टाग्राम वापरकर्त्या ‘टेड द स्टोनर’ याने शुक्रवारी हा व्हिडीओ पोस्ट केला.

एका मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये दोन पुरुष दिसत आहेत. खेचराच्या पाठीवर खोगीर आहे. म्हणजे या खेचराचा वापर यात्रेकरूंना नेण्यासाठी केला जाणार होता आणि त्याला ‘धूम्रपान’ करण्यास भाग पाडले जात होते. व्हिडीओमध्ये दिसणारी एक व्यक्ती तळहाताने प्राण्याचे एक नाकपुडी बंद करत आहे आणि मालक दुसर्‍या नाकपुडीतून सिगारेटमधील घटक आत घेण्यास भाग पाडत असल्याचे दिसत आहे. यावेळी खेचर थरथर कापत असल्याचे आणि सुटका होण्यासाठी धडपडत असल्याचे दिसत आहे. ‘हा प्रकार थांबवण्यासाठी एक समिती स्थापन व्हावी. जेणेकरून हे कौर्य करणाऱ्या लोकांना शिक्षा मिळेल,’ असे या पोस्टमध्ये लिहिले आहे.

हे ही वाचा:

सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले १० कोटींचे हेरॉईन

मर्द पुन्हा महिलेवर बाह्या सरसावू लागले…

‘विरोधी पक्षांच्या एकजुटीनेही’; ‘भाजपचे नुकसान नाही’!

‘पंतप्रधान मोदी’ आणि ‘इजिप्तचे पंतप्रधान मोस्तफा मादबौली’ यांची भेट!

‘ठाण्याच्या हवालदाराला’ दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉनमध्ये ”ब्राँझ” !

या वर्षी सुरू असलेल्या चारधाम यात्रेच्या हंगामात पोलिसांनी प्राण्यांच्या क्रूरतेशी संबंधित १४ गुन्हे दाखल केले आहेत. ‘प्राण्यांवरील अत्याचाराच्या प्रत्येक प्रकरणात पोलिस तत्परतेने कारवाई करतात,’ असे रुद्रप्रयागच्या पोलिस अधीक्षक विशाखा अशोक भदाणे यांनी सांगितले.

२२ एप्रिलपासून ११५ खेचर, घोड्यांचा मृत्यू

चारधाम आणि हेमकुंड साहिब मार्गावर काम करणारे एकूण ११५ खेचर आणि घोडे या वर्षी २२ एप्रिलपासून-चारधाम यात्रा सुरू झाल्यापासून मृत्युमुखी पडले आहेत. उत्तराखंड पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथ जिथे १६ किमीचा यात्रा मार्ग गौरीकुंडापासून मंदिराकडे जातो, तिथे आतापर्यंत ९० खेचरांचा मृत्यू झाला आहे. तसेच, उत्तरकाशीतील यमुनोत्री आणि गंगोत्री मंदिरांकडे जाणाऱ्या यात्रा मार्गावर १७ घोडे मरण पावले आहेत. चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिब मार्गावर आठ प्राणी मरण पावले आहेत, असे प्राणीहक्क कार्यकर्त्या शिवानी आझाद सांगतात. अतिशोषण, जबरदस्तीने काम केल्यामुळे होणाऱ्या दुखापती आणि आजारांवर उपचार न करणे अशी अनेक कारणे या मृत्युमागे असल्याचे त्या सांगतात. तर, पशुसंवर्धन विभागाचे संचालक मात्र प्राण्यांवरील हिंसाचार रोखण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचा दावा करत आहेत.

Exit mobile version