‘शिवछत्रपती’ राज्य क्रीडा पुरस्कारासाठींच्या यादीत घोडेस्वारी, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर, यॉटींगसह एरोबिक्स, ॲक्रोबॅटीकचा खेळांचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. फेर समाविष्ट केलेल्या क्रीडा प्रकारातील अर्ज मागवून घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता दिले आहेत.
सुधारित शासन निर्णयात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतील ४४ क्रीडा प्रकारांपैकी घोडेस्वारी, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर व यॉटींग या सात प्रकारांना वगळण्यात आले होते. या वगळण्यात आलेल्या क्रीडा प्रकारांसह जिम्नॅस्टिक खेळामधील उपप्रकार असणाऱ्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा पुन्हा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या पात्र यादीत सामावेश करण्याचे निर्देश महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. तसेच यंदाच्या (सन २०२२-२३) पुरस्कारांसाठी फेरसमाविष्ट केलेल्या क्रीडा प्रकारातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने तातडीने मागवून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी पात्र क्रीडा प्रकारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या खेळांच्या संघटनांनी त्यांच्या खेळांचा समावेश करण्याबाबत क्रीडा संचालनालयास पत्रव्यवहार केला होता, त्या अनुषंगाने मंत्रालयात महाराष्ट्र ऑलिंम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, उद्योग मंत्री उदय सामंत, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे क्रीडा विभागाचे आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर (दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे), उपाध्यक्ष संजय शेटे,अरुण केदार, अजित सावंत (कॅरम), संजय सरदेसाई, संजय माधव (पॉवर लिफ्टिंग), महेंद्र चेंबुरकर ( जिम्नॅस्टिक्स), देवेंद्र जोशी, क्षितीज वेदक (बिलियर्ड्स आणि स्नूकर), विजय झगडे, राजेश सावंत (बॉडिबिल्डींग), विठ्ठल शिरगावकर (मॉडर्न पेन्टॅथलॉन) आदी मान्यवर उपस्थित होते.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूट्यूब चॅनलने केला विक्रम!
हमाससोबतच्या लढाई दरम्यान झालेल्या स्फोटात इस्रायलचे २१ सैनिक ठार
एक कोटी घरांवर लागणार सौरऊर्जा यंत्रणा
कोट्यवधींच्या सुवर्णदागिन्यांनी सजला रामलल्ला!
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोणताही खेळाडू तो खेळत असलेल्या क्रीडा प्रकारात यश मिळविण्यासाठी त्याची उमेदीची वर्षे खर्च करतो, आपले सर्वस्वपणाला लावतो. आपल्या कौशल्य आणि मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या राज्यासह देशाचे नाव उज्ज्वल करतो. अशा खेळाडूंच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने शिवछत्रपती पुरस्कार देण्यात येतात.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या सुधारित शासन निर्णयातून पात्र क्रीडाप्रकारांच्या यादीतील ४४ क्रीडा प्रकारांपैकी घोडेस्वारी, गोल्फ, पॉवरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बिलीयर्डस अँन्ड स्नूकर व यॉटींग या सात प्रकारांना वगळण्यात आले होते. या खेळांचा पुन्हा पात्रता यादीत समावेश करण्यासह जिम्नॅस्टिक खेळामधील उपप्रकार असणाऱ्या एरोबिक्स व ॲक्रोबॅटिक्स या क्रीडा प्रकारांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या पात्र यादीत सामावेश करावा. तसेच सन २०२२-२३ या वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यांची मुदत २२ जानेवारीपर्यंतच होती. ही मुदत सुध्दा पुन्हा वाढवून या नव्याने समाविष्ट केलेल्या खेळांसाठीचे अर्ज ऑनलाईन मागविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.