समृद्धी महामार्गावरील अपघाताचे सत्र कमी होत नसून मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या गाडीचा वन्यप्राण्याला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
वाशीम जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी वनोजा कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक १९६ जवळ हा अपघात घडला. दुरतकर कुटुंबीय गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जात असताना समृद्धी मार्गाने प्रवास करत होते. यावेळी अचानक वन्यप्राण्यांना अडथळा म्हणून लावलेले कठडे ओलांडून प्राणी रस्त्यावर आले आणि वाहनाला धडक बसून हा अपघात झाला.
अपघात झाल्यानंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले कारमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गाडीसमोर आलेल्या प्राण्याला वाचवण्याच्या नादात कार तीन वेळा पलटी झाली. त्यानंतर गाडीमधील तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले तर सुनंदा अनुज दुरतकर यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा:
तामिळ संगीतकार, अभिनेता विजय अँटनी यांच्या मुलीने केली आत्महत्या !
इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजारा एका सामन्यासाठी निलंबित !
अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उजैर खानचा खात्मा !
कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी !
समृद्धी महामार्गावर अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत लहान-मोठे ७२९ अपघात झाले असून त्यापैकी ४७ अपघात जीवघेणे ठरले आहेत. अपघातात १०१ जणांनी प्राण गमावला असून इतर अपघातात २६२ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखण्याचे काम सुरू आहे.