आयपीएल २०२४ च्या पहिल्याच सामन्यात चेन्नईने बेंगळुरूचा सहा विकेटने पराभव करून विजयी सलामी दिली. बेंगळुरूने पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारून २० षटकांत सहा विकेट गमावून १७३ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाने आठ चेंडू शिल्लक ठेवून सहा विकेटने सामना खिशात टाकला.
कर्णधाराची विजयी सलामी
चेन्नईची सुरुवात चांगली झाली. ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली. मात्र ही जोडी यश दयालने तोडली. ऋतुराजने १५ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अजिंक्य राहाणे उतरला. दुसऱ्या विकेटसाठी रहाणे आणि रचिन रवींद्र यांनी ३३ धावांची भागीदारी केली. रचिन रवींद्रने तीन चौकार व तीन षटकारांसह ३७ धावा केल्या. रहाणे २७ धावा करून बाद झाला. तर, चौथ्या क्रमांकावर आलेल्या डेरिल मिचेलने दोन षटकारांसह २२ धावा केल्या.
जडेजा आणि दुबे यांची विजयी भागीदारी
चेन्नईच्या विजयात शिवम दुबे आणि रवींद्र जाडेजा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांनी ३७ चेंडूंत ६६ धावांची नाबाद भागीदारी केली. दुबेने चार चौकार आणि एक षटकार ठोकून ३४ धावा केल्या. तर, जाडेजाने १७ चेंडूंत २५ धावा केल्या. हे दोन्ही खेळाडू नाबाद राहिले. बेंगळुरूसाठी कॅमरॉन ग्रीनने दोन विकेट घेतल्या तर, यश दयाल आणि कर्ण शर्माने प्रत्येकी एकेक विकेट घेतल्या.
बेंगळुरूचे सलामीचे फलंदाज अपयशी
बेंगळुरूने पहिल्यांदा फलंदाजी करून चेन्नईला १७४ धावांचे लक्ष्य दिले. पहिल्या विकेटसाठी विराट कोहली व फाफ डुप्लेसिस यांनी ४१ धावांची भागिदारी केली. मुस्तफिजुर रहमान याने डुप्लेसिस याची पाचव्या षटकांतील तिसऱ्या चेंडूवर विकेट घेतली. कर्णधार डुप्लेसिसने आठ चौकारांसह ३५ धावा केल्या. पाटीदार शून्यावर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलही खाते न उघडताच तंबूत परतला. दीपक चहरने सहाव्या षटकात तिसऱ्या चेंडूवर त्याची विकेट घेतली. चौथ्या विकेटसाठी विराट कोहली आणि कॅमरन ग्रीन यांनी ३५ चेंडूंत ३५ धावांची भागीदारी केली. मुस्तफिजुर रेहमान याने विराट कोहलीला बाद केले. तर, १२व्या षटकांतील चौथ्या चेंडूवर कॅमरॉन ग्रीनला त्याने त्रिफळाचीत केले.
हे ही वाचा:
इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांचा मॉस्कोमध्ये हल्ला; १४० जणांचा मृत्यू
पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये भव्य स्वागत!
केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली
कर्नाटक: काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत १७ पैकी ११ उमेदवार मंत्र्यांचे नातेवाईक!
अनुज रावत आणि दिनेश कार्तिक संकटमोचक
या विकेटनंतर बेंगळुरूला चांगल्या भागीदारीची गरज होती. पाच विकेट गमावून संघाच्या ७८ धावा झाल्या होत्या. तेव्हा सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आलेल्या अनुज रावत आणि दिनेश कार्तिक याने ९५ धावांची भागिदारी केली. अनुज याने २५ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह ४८ धावा केल्या. त्याला चेन्नईचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक धोनी याने शेवटच्या षटकात धावचीत केले. तर, दिनेश कार्तिक तीन चौकार व सहा षटकार ठोकून ३८ धावा करत नाबाद राहिला. चेन्नईच्या मुस्तफिजुर रहमान याने दोन षटकांत चार विकेट घतेल्या. तर, दीपक चहरने एक विकेट घेतली.