मोदी सरकारने सुरू केलेल्या अग्निवीर योजनेवरुन गदारोळ सुरू असतानाच आता सरकारने माजी अग्निवीरांसाठी मोठी घोषणा केली आहे. अग्निवीर योजनेतील अग्निवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये आरक्षण देण्यात येणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवार, २४ जुलै रोजी राज्यसभेत एका लेखी उत्तरात याबद्दल माहिती दिली.
“केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) आणि आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)/रायफलमन पदाच्या भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अग्निवीर जवानांना वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीतूनही सूट देण्यात येत आहे,” असं सांगण्यात आले आहे.
गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सीएपीएफ आणि आसाम रायफल्समधील रिक्त पदांचीही माहिती दिली. ते म्हणाले की, “सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये १ जुलै २०२४ पर्यंत रिक्त पदांची संख्या ८४,१०६ आहे. एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४, या कालावधीत ६७,३४५ उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. याशिवाय ६४,०९१ रिक्त पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. ही पदे भरतीच्या विविध टप्प्यात आहेत.”
हे ही वाचा:
ऑलिम्पिक स्पर्धेच्या तोंडावर ऑस्ट्रेलियन महिलेवर पॅरिसमध्ये बलात्कार
प्रत्येक राज्याचे नाव अर्थसंकल्पात घेणे शक्य नसते हे काँग्रेसला कळत नाही?
काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळले, १८ जणांचा मृत्यू !
जरांगे पाटलांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी !
मोदी सरकारने अग्नीवीर योजना सुरू केली होती या अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सैनिकांची भरती केली जाते. सशस्त्र दलातील नियुक्तीची ही एक नवीन श्रेणी आहे. या अंतर्गत ७५ टक्के अग्निवीर चार वर्षांच्या सेवेनंतर कोणत्याही पेन्शन लाभाशिवाय निवृत्त होतात, तर उर्वरित २५ टक्के अग्निवीर नियमित सैनिक म्हणून दलात सामील होतात. या योजनेवरुन विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळेच आता सरकारने उर्वरित ७५ टक्के अग्निवीरांच्या रोजगाराची व्यवस्था केली आहे.