खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमुळे भारत आणि कॅनडामधील तणाव वाढले असतानाच, बांगलादेशनेही कॅनडाच्या प्रत्यार्पण नियमांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. कॅनडाने बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रेहमान यांचा मारेकरी नूर चौधरी याचे प्रत्यार्पण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बांगलादेशनेही ‘कॅनडा हा मारेकऱ्यांचा गड झाला आहे,’ अशी टीका केली आहे.
‘कॅनडाने सर्व मारेकऱ्यांचे केंद्र होणे योग्य नाही. हे मारेकरी कॅनडात जातात, तिथले शरणार्थी होतात आणि ऐषारामाचे जीवन जगतात,’ असे वक्तव्य बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले. बांगलादेशच्या या तिखट प्रतिक्रियेमुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याची चिन्हे आहेत. मात्र कॅनडा हा गुन्हेगारांचे कसे आश्रयस्थान झाला आहे, तिथे त्यांना कशी सुरक्षा मिळते, हेदेखील पुन्हा अधोरेखित झाले आहे.
हे ही वाचा:
जखमी श्वानाच्या मालकाचा रतन टाटा घेताहेत शोध
कुख्यात गुंड आतिकच्या भावाच्या बेनामी संपत्तीची रहस्ये उलगडली
तरुणाने आत्महत्येचे पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला हेरले!
कॅनडामध्ये प्रवेश मिळालेले तब्बल छत्तीस हजार विद्यार्थी चिंतेत
कॅनडाच्या नियमानुसार, जर त्यांच्या देशातील कोणा व्यक्तीला दुसऱ्या देशात प्रत्यार्पण करायचे असेल, मात्र त्या व्यक्तीला त्या दुसऱ्या देशात मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली जाणार असेल, तर कॅनडा त्या व्यक्तीचे दुसऱ्या देशात प्रत्यार्पण करत नाही. याच नियमाचा हवाला देऊन कॅनडा नूर चौधरी यांचे प्रत्यार्पण करत नसल्याचे बोलले जात आहे. त्यावर ‘त्यांच्याकडे प्रत्यार्पण नाकारण्यासाठी एकाहून अधिक कारणे आहेत. त्याच्याकडे कायदा आहे, परंतु कायद्याने कोणत्याही मारेकऱ्याचे रक्षण करणे अपेक्षित नाही. मात्र कॅनडा असे करतो आहे. तसेच, आमची न्यायपालिका स्वतंत्र आहे. सरकार न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप करत नाही. कदाचित त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाईल,’ असे स्पष्टीकरण मोमन यांनी दिले आहे.
बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रेहमान यांचा एक मारेकरी नूर चौधरी तर दुसरा मारेकरी राशिद चौधरी अमेरिकेत वास्तव्याला आहे. राशिद याने खोटी कागदपत्रे जमा करून अमेरिकेचे नागरिकत्व मिळवले आहे. त्याने अवैध मार्गाने नागरिकत्व मिळवल्यामुळे आता त्याचे प्रत्यार्पण करण्यासंदर्भात अमेरिका न्यायालय विचार करणार आहे. त्यामुळे बांगलादेशनेही कॅनडाकडे नूर चौधरी हा कॅनडाचा नागरिक आहे का, असे विचारले आहे. मात्र याबाबत कॅनडा सरकार काहीच बोलायला तयार नाही.