कॅनडाच्या भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्यास सुरुवात

एकूण ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना भारतातून बाहेर पडावे लागेल.

कॅनडाच्या भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्यास सुरुवात

Canada India High Resolution Sign Flags Concept

केंद्र सरकारने कॅनडाला भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या कमी करण्यास सांगितल्यानंतर कॅनडाने भारतातील बहुतेक अधिकाऱ्यांना माघारी बोलावले आहे. तसेच, त्यांना क्वालालंपूर किंवा सिंगापूर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरून दोन्ही देशांमधील ताण वाढले असतानाच ही नवी घडामोड समोर आली आहे.

 

कॅनडाच्या सीटीव्ही न्यूजच्या अहवालानुसार, नवी दिल्लीच्या बाहेर तैनात असलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना क्वालालंपूर किंवा सिंगापूर येथे हलवण्यात आले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, भारताने कॅनडाला १० ऑक्टोबरपर्यंत अंदाजे ४० राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्यास सांगितल्याचे वृत्त लंडनस्थित वृत्तपत्र, ‘फायनान्शिअल टाइम्स’ने दिले होते. तसेच, १० ऑक्टोबरनंतर भारतात राहणाऱ्या कोणत्याही राजनैतिक अधिकाऱ्यांचे ‘राजनैतिक’ कवच काढून टाकण्याची इशाराही भारत सरकारने दिल्याचे या वृत्तात म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी भारताने कॅनडाला राजनैतिक कर्मचारी कमी करण्यास सांगितल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. राजनैतिक मनुष्यबळाच्या बाबत दोन्ही देशांमध्ये समानता असायला हवी, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.

 

हे ही वाचा:

भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनचे पहिले सुवर्ण

‘डाव्या कट्टरवादाचे दोन वर्षांत उच्चाटन’

ऑनलाईन गेमिंग ऍप प्रकरणी बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापा

सिक्किममध्ये पुरामधून वाहून आलेला तोफगोळा फुटला

‘भारतात कॅनडाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची एकूण संख्या आणि आमच्या अंतर्गत बाबींमध्ये त्यांचा सतत हस्तक्षेप लक्षात घेता, आम्ही दोन्ही देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या मनुष्यबळामध्ये समानतेची अपेक्षा केली होती,’ असे बागची म्हणाले.
आतापर्यंत भारतातून किती जणांना माघारी बोलावण्यात आले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र एकूण ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना भारतातून बाहेर पडावे लागेल. भारतात काम करणाऱ्या कॅनेडियन राजनैतिक अधिकाऱ्यांपैकी बहुतेकांना क्वालालंपूर किंवा सिंगापूरला हलवण्यात आले आहे. तथापि, भारतीय किंवा कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी अद्याप या घडामोडीला अधिकृतपणे प्रतिसाद दिलेला नाही.

 

 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी १९ सप्टेंबर रोजी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय दलालांचा ‘संभाव्य’ सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर अलीकडेच भारत आणि कॅनडाचे राजनैतिक संबंध बिघडले. निज्जर हा कॅनडाचा नागरिक होता. १८ जून रोजी ब्रिटिश कोलंबियामध्ये दोन मुखवटाधारी बंदूकधाऱ्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. तथापि, भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर कॅनडाने एका भारतीय अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्यावर भारतानेही कॅनडाच्या एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला काढून टाकले आहे.

Exit mobile version