शिंदे फडणवीस सरकारकडून ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. मुंबई पालिकेच्या कामाची आता ‘कॅग’कडून चौकशी होणार आहे. कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या कामात तब्बल बारा हजार कोटींचा गैरव्यवहार झाला असा संशय राज्य सरकारला आला आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची विनंती शिंदे फडणवीस सरकारकडून कॅगला करण्यात आली आहे.
राज्य सरकारने मुंबई महापालिकेच्या कामात सुमारे बारा कोटींच्या कामांचे कॅगच्या माध्यमातून लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार गैरव्यवहार प्रकरणांची तपासणी करण्याची तयारी कॅगने दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच कॅगचे पथक पालिकेत दाखल होईल, असं म्हटलं जातं आहे.
हे ही वाचा:
मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश
भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची
मुख्यमंत्री आणि घटनात्मक व्यक्तिविरोधात ट्विट करणाऱ्या एकाला अटक
कोरोनाकाळात मुंबई पालिकेने मुंबईमध्ये उभारलेल्या कोरोना केंद्रांत भ्रष्टाचार झाला असा आरोप भाजपाच्या आमदारांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांची चौकशी करणार असल्याचं म्हटलं होतं. यावर शिंदे फडणवीस सरकारने कॅगकडे या चौकशीची मागणी केली होती. कॅगने ही चौकशी करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये मुंबई महापालिकेतील सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या ७६ कामांची कॅगकडून चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना केंद्रे उभारणी, जमीन खरेदी, रस्त्यांची कामे, सफाई कामगारांच्या घरांसाठी असलेल्या आश्रय योजना, भेंडी बाजार पुनर्विकासात रस्त्याची रुंदी कमी करून विकासकाचा झालेला फायदा, मुंबई पालिकेतील काही अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्वत:च कंपन्या सुरू करून पालिकेची कामे लाटल्याचा आरोप, या सर्वाची चौकशी केली जाणार आहे.