लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या विकासासाठी मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इंटिग्रेटेड मल्टीपर्पज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फॉर युनियन टेरिटरी ऑफ लडाखच्या निर्मितीला मोदी सरकारने मान्यता दिली आहे. गुरुवार २२ जुलै रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सरकारच्या या निर्णयामुळे लडाखच्या विकासाला चालना मिळणार आहे.
इंटिग्रेटेड मल्टीपर्पज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन फॉर युनियन टेरिटरी ऑफ लडाख हे एकिकृत बहुउद्देशीय या प्रकारचे विकास महामंडळ असणार आहे, जे लडाख भागाच्या विकासासाठी समर्पित असणार आहे. या महामंडळाला २५ कोटींचे भागभांडवलही मान्य करण्यात आले आहे. लडाख भागातील विकासाला समर्पित असलेली ही याप्रकारची पहिली संस्था असणार आहे.
हे ही वाचा:
चिपळुणात पूरपरिस्थिती, कोकणात हाहाकार
पेगॅसस हेरगिरी प्रकरणात ॲमनेस्टीचा घुमजाव
ऑलिंपिकच्या उद्घाटनाची प्रतीक्षा… भारतीय खेळाडू सज्ज!
उद्योग, पर्यटन, वाहतूक आणि स्थानिक उत्पादनांचे तसेच हस्तकला उत्पादनांचे विपणन यासाठी हे महामंडळ काम करेल. लडाख मधील पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी बांधकाम मध्यस्थ म्हणूनही हे महामंडळ कार्यरत राहील. या महामंडळाच्या स्थापनेमुळे लडाख भागातील नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला चालना मिळणार आहे.
या विकासाचे बहुआयामी परिणाम असणार आहेत. लडाखमधील उत्पदनाला वाव मिळणार असून सेवा पुरवठादारांनाही प्रोत्साहन दिले जाईल. ज्यामुळे मानवी संसाधनांचा विकास होण्यासही मदत मिळणार आहे. तर मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी अशा आत्मनिर्भर भारत योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनेही हे एक महत्वाचे पाऊल असणार आहे.