ओडिशामध्ये पुलावरून बस कोसळून अपघात; पाच ठार

बसमधून ५० जण प्रवास करत असल्याची माहिती; अनेक जण जखमी

ओडिशामध्ये पुलावरून बस कोसळून अपघात; पाच ठार

ओडिशा राज्यात सोमवार, १५ एप्रिल रोजी मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ओडिशातील जाजपूर येथे हा भीषण अपघात झाला आहे. एक प्रवासी बस पुलावरून खाली कोसळून हा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त बस ही ओडिशामधून पश्चिम बंगालमध्ये जात होती. ही बस पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया येथे प्रवाशांना घेऊन जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस रसूलपूर परिसरातील बाराबती चौकाजवळील ओव्हर ब्रिजवरून खाली पडली. दरम्यान या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघात घडला त्यावेळी बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह सुमारे ५० लोक प्रवास करत होते.

अपघाताची माहिती मिळताच तातडीने शोधकार्य आणि बचाव मोहीम राबविण्यात आली. जाजपूरचे जिल्हाधिकारी आणि एसपी यांच्या नेतृत्वाखाली अपघातस्थळी बचाव मोहीम राबविण्यात आली. तसेच क्रेनच्या साहाय्याने पुलाखालील बस बाहेर काढण्यात आली. यावेळी गंभीर जखमींना प्रथम जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतरांवरही उपचार सुरू आहेत. या अपघतात दुर्दैवाने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

दिनेश कार्तिकच्या ८३ धावा ठरल्या अपुऱ्या

‘निवडणूक रोखे मागे घेतल्याने प्रत्येकाला पश्चात्ताप होईल’

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना गुजरातमधून अटक

मीरारोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा संताप; चिकन दुकानदाराने ४ वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार

दरम्यान, ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शोक व्यक्त करत अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय पटनायक यांनी जिल्हा प्रशासनाला जखमींवर उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

Exit mobile version