बस चालकाचे धाडस पडले महागात! बस गेली वाहून

बस चालकाचे धाडस पडले महागात! बस गेली वाहून

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे घडलेल्या एका बस अपघाताने सारे राज्य हादरले आहे. यावेळी बस चालकाचे अतिधाडस हे प्रवाशांच्या जीवावर बेतले. दहागाव येथे प्रचंड वेगाने वाहत असणाऱ्या पाण्यात बस घालणे हे बस चालकाला चांगलेच महागात पडले आहे. मंगळवार, २८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास हा सारा प्रकार घडला.

मंगळवारी सकाळची नांदेड-नागपूर ही बस यवतमाळ जिल्ह्यातून जात होती. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मधल्या दहागाव येथून ही बस नागपूरच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी दहागाव पुलावरुन अतिप्रचंड वेगाने पुराचे पाणी वाहत होते. पाण्याच्या या प्रवाहामुळे या पुलावरऔन बस पुढे नेणे धोकादायक होते. पण तरीही बस चालकाने हट्टाने याच रस्त्यावरून जाण्याचा निर्णय घेतला. त्या रस्त्यावर उपस्थित स्थानिकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा उपयोग झाला नाही.

बस चालकाने पुराच्या पाण्यात बस घुसवली. थोड्या अंतरावर गेल्यावर बस डाव्या बाजूला झुकताना दिसत होती. पाण्याच्या प्रवाहापुढे चालकाचे काहीही चालले नाही. बसवरचा त्याचा ताबा सुटला आणि बघता बघता ही बस पुराच्या पाण्यात वाहून गेली. या बस मध्ये एकूण १५ प्रवासी होते अशी माहिती मिळत आहे. या घटनेच्यावेळी उपस्थित स्थानिकांनी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.

Exit mobile version