डम्परला धडकून बस पेटली; १२ जणांचा होरपळून मृत्यू!

मृतांच्या संख्येत भर पडण्याची शक्यता

डम्परला धडकून बस पेटली; १२ जणांचा होरपळून मृत्यू!

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात डम्पर आणि बसच्या धडकेत बसला आग लागून १२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. रात्री उशिरापर्यंत ११ मृतदेहांना बाहेर काढण्यात आले होते. तर, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बुधवारी रात्री बस गुनाच्या दिशेने जात होती. रात्री सुमारे साडेआठ वाजता गुना जिल्ह्यात डम्परला धडकल्यावर बस उलटली आणि बसला आग लागली. त्यात १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर, अनेकजण जखमी झाले. आजूबाजूच्या लोकांनी जिवाची बाजी लावून जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर एका तासापर्यंत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नव्हती, असा आरोप केला जात आहे. आग लागल्यानंतर येथे वाहतूककोंडीही झाली होती.

हे ही वाचा:

इस्रो आता ब्लॅक होलचा अभ्यास करणार

धुक्याच्या विळख्यामुळे उत्तर भारतात शाळांना सुट्टी

युपीत नायब तहसीलदार मशिदीत पढत होता नमाज

येरुणकर हत्येसाठी शस्त्र पुरवणाऱ्या ज्वेलर्ससह दोन जण अटकेत

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या बस दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
बसमधील प्रवासी अंकित कुशवाह याने याबाबत अधिक माहिती दिली. ‘बस गुनाहून आरोनच्या दिशेने जात होती. मी पुढच्या सीटवर बसलो होतो. मात्र अचानक अपघात झाला.

तेव्हा काहीच समजले नाही. माझे डोळे बंद झाले होते. मात्र माझे डोळे उघडले तेव्हा मी काचेतून बाहेर पडलो आणि तीन ते चार जणांना मी आणि माझ्या मित्रांनी बाहेर काढले. त्यानंतर बसला आग लागली आणि कोणीच बसमधून बाहेर पडू शकले नाहीत. मी सुमारे आठ जणांची जिवंत सुटका केली. बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते,’ असे अंकितने सांगितले.

Exit mobile version