लग्नाला निघालेली बस कोसळली दरीत

लग्नाला निघालेली बस कोसळली दरीत

आंध्र प्रदेश मधील चित्तूर मध्ये एक भीषण बस अपघात झाला आहे. चित्तूर जिल्ह्यातून लग्नासाठी म्हणून निघालेली ही बस दरीत कोसळली असून या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४४ जण जखमी झाले आहेत. शनिवार, २६ मार्च रोजी रात्री हा अपघात घडला.

आंध्र प्रदेश मधील चित्तूर जिल्ह्यातून ही बस प्रवास करत होती. पण या प्रवासा दरम्यान जिल्ह्यातील भाकर पेठ घाट मार्गावर ही बस दरीत कोसळली. रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात घडला. या बसमधून एकूण ५२ प्रवासी प्रवास करत असून नागरी गावाजवळ एक लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी ते जात होते. पण हा प्रवास काहींसाठी अंतिम प्रवास ठरला. ५० फूट उंचीवरून ही बस दरीत कोसळली. आतापर्यंत या अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ४४ जण जखमी झाल्याचीही माहिती आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीचे मंत्री विरुद्ध काँग्रेसचे आमदार! ट्विटरवर जुंपली

‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला ‘नो’ एन्ट्री

‘महाराष्ट्र बारव मोहीम’ सुरू करणाऱ्या रोहन काळेंच पंतप्रधान मोदींकडून कौतुक

या अपघाताची माहिती मिळताच तिरुपती शहर पोलीस अपघाताच्या ठिकाणी पोहोचले असून त्यांनी तातडीने बचावकार्याला सुरुवात केली. अपघातातील जखमींना एसव्हीआर रुईया सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार बसचालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडून आला आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून मदतही जाहीर केली आहे. “आंध्रप्रदेशातील चित्तूर, येथे भीषण बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. आशा व्यक्त करतो, की जखमी लवकर बरे होतील. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल:” असे पंतप्रधानांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version