बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह आज (२९ सप्टेंबर) स्मशानात दफन करण्यात आला. उल्हासनगरच्या शांती नगर स्मशान भूमीत मृतदेह दफन करण्यात आला. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये अक्षयच्या मृतदेहावर अंत्यविधी पार पडला. यावेळी मृत अक्षयचे आई-वडील कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
तब्बल ६ दिवसानंतर अक्षयचा अंत्यविधी पार पडला. अक्षयच्या गुन्ह्यामुळे त्याचा मृतदेह स्मशान भूमीत दफन न करण्याचा निर्णय बदलापूर स्थानिकांनी घेतला होता. स्थानिकांच्या विरोधानंतर मृतदेह दफन करण्यासाठी पोलिसांनी इतर स्मशान भूमी शोधण्यास सुरवात केली. यानंतर बदलापूर, अंबरनाथ, कळवा येथील स्मशानात मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रत्येक वेळी नागरिकांनी विरोध केला. अखेर पोलिसांनी उल्हासनगरमधील स्मशान भूमीचा शोध घेतला आणि कोणाला समजायच्या आत मृतदेह पुरण्यासाठी पहाटेच्यावेळी खड्डा खोदण्यात आला.
हे ही वाचा :
मोदींना सत्तेतून हटवणार नाही, तोपर्यंत जिवंत राहीन!
जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान!
उल्हासनगरमध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्यास विरोध, खोदलेला खड्डा बुजवला!
परंतु, सकाळ होताच नागरिकांना याची माहिती मिळाली आणि परिसरातील महिला, पुरुष, तृतीय पंथी एकवटले आणि मृतदेह पुरण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्डा त्यांनी बुजवला. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या फौजफाट्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि विरोध करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेतले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अक्षयचा मृतदेह याच स्मशानात दफन करण्याचा पोलिसांनी निर्णय घेतल्यामुळे नागरिकांनी बुजवलेला खड्डा पोलिसांनी पुन्हा खोदून काढला. यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये कळवा शवगृहात ठेवण्यात आलेला अक्षयचा मृतदेह उल्हासनगरच्या शांती नगर स्मशान भूमीत आणण्यात आला. मृत अक्षयचे आई-वडील नातेवाईक यावेळी उपस्थित अक्षयचा मृतदेह दफन करण्यात आला.